पंढरपूर : प्रतिनिधी
विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनाची विठ्ठलभक्तांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. येत्या जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरू होण्याची शक्यता आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन आणि सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
महिनाअखेर काम पूर्ण होईल आणि जूनपासून विठुरायाचे पदस्पर्श सुरू होईल, अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला मूळ रूप देण्यासाठी राज्य सरकारने सुमारे ७४ कोटी रुपयांचा मंदिर विकास आराखडा मंजूर केला. पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली १५ मार्चपासून हे काम सुरू आहे. मंदिराचे काम सुरू असल्याने भाविकांसाठी विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन बंद आहे. पहाटे सहा ते सकाळी अकरा वाजेपर्यंत मुखदर्शन सुरू आहे.