चंद्रपूर : लाल मिरचीला नगदी पीक म्हणून ओळखले जाते. पारंपरिक पिकाऐवजी शेतकरी नगदी पिकाकडे वळत आहेत. परंतु खर्च जास्त आणि उत्पन्न कमी होत असल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील मिरची उत्पादक संकटात सापडले आहेत. सध्या भाव पडल्याने व तोड्याचा खर्च शेतक-यांना परवडणारा नसल्याने लाल मिरची झाडालाच आहे. मिरचीचा तोडा करायचा की नाही, असा प्रश्न शेतक-यांना पडला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात धानपिकाचे क्षेत्र सर्वांत जास्त आहे. परंतु परंपरागत काळापासून धानाचेच उत्पादन घेत असल्याने शेतकरी नेहमीच संकटात सापडत आहे. पारंपरिक पिकाऐवजी नवनवीन पिकांची लागवड करण्यास शेतकरी पुढे येत आहे. धानासह कापूस, सोयाबीन, मिरची व बागायती पिकांकडे शेतकरी वळला आहे. विशेष म्हणजे राजुरा, कोरपना, बल्लारपूर, वरोरा, भद्रावती, गोंडपिपरी या परिसरात कापूस, सायोबीन, मिरची व बागायती पिकांची लागवड केली जात आहे. या वर्षात राजुरा, कोरपनासह जिल्ह्यात सुमारे बाराशे हेक्टरमध्ये मिरची पिकाची लागवड करण्यात आली आहे.
सध्या मिरचीचा एक तोडा संपला आहे तर दुसरा तोडा सुरू होण्याच्या मार्गावर आहे. जिल्ह्यातून लाल मिरचीची निर्यात नागपूरसह अन्य राज्यात होते. परंतु अचानक भाव पडल्याने मिरची उत्पादक संकटात सापडला आहे.
तोड्याअभावी शेतक-यांच्या बागांमध्ये लाल मिरची झाडालाच दिसून येत आहे. पडलेल्या भावाने उसळी घेतली नाही तर लाल मिरची उत्पादकांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागू शकते.