लोकसभा अध्यक्षांना लिहिले पत्र
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
लोकसभेत राहुल गांधी यांनी हिंदूंबाबत केलेल्या वक्तव्यावरून प्रचंड गदारोळ झाला. त्यानंतर राहुल गांधींच्या भाषणातून मोठा भाग वगळण्यात आला. त्यामुळे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी यासंदर्भात लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून निषेध व्यक्त केला. आपल्या भाषणाचा मोठा भाग संसदेच्या कामकाजातून काढून टाकल्याने आपल्याला धक्का बसल्याचे राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधी यांनी आपल्या पत्रात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेदरम्यान माझ्या भाषणातील काही भाग वगळण्यात आल्याने मी हे पत्र लिहित आहे. सभागृहाच्या कामकाजातून भाषणाचा काही भाग वगळण्याचा अधिकार अध्यक्षांना असला तरीदेखील लोकसभेतील कार्यपद्धती आणि कामकाजाच्या नियमांच्या नियम ३८० मध्ये जे स्वरूप नमूद केले आहे, तेच शब्द वगळण्याची तरतूद आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
माझ्या भाषणाचा मोठा भाग कार्यवाहीतून कसा काढून टाकण्यात आला आणि उतारे हटवण्याच्या नावाखाली कसे हटवले गेले हे पाहून मला धक्का बसला आहे. हटवलेले भाग नियम ३८० च्या कक्षेत येत नाहीत, असे मी म्हणण्यास बांधील आहे. मला सभागृहात जो संदेश द्यायचा होता, तो म्हणजे ग्राउंड रिअॅलिटी, वस्तुस्थिती आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
लोकांच्या समस्या
मांडण्याचा अधिकार
सदनातील प्रत्येक सदस्य जो लोकांच्या सामूहिक आवाजाचे प्रतिनिधित्व करतो, त्याला भारतीय राज्यघटनेच्या कलम १०५ (१) नुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. लोकांच्या समस्या सभागृहात मांडणे हा प्रत्येक सदस्याचा अधिकार आहे. देशातील लोकांप्रती असलेली माझी जबाबदारी पार पाडत आहे, असे राहुल गांधी यांनी पत्रात म्हटले.
राहुल गांधींनी हिंदूंची
खरी व्याख्या सांगितली
लोकसभेत काल राहुल गांधींचे राष्ट्रपतींच्या प्रस्तावाच्या भाषणावर झाले. या भाषणात राहुल गांधींनी भाजपाच्या १० वर्षाच्या रणनितीवर सडकून टीका केली. इतकेच नव्हे तर सर्वधर्मीय देवी-देवतांचे फोटो लोकसभेत दाखवत त्यांनी हिंदुत्त्वाची व्याख्या सभागृहाला समाजावून सांगितली. डरो मत असा आशयाचा मॅसेज राहुल गांधींनी संसदेत दिला, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींच्या भाषणाचे समर्थन केले.