जसरोटा : वृत्तसंस्था
जम्मू-काश्मिरमध्ये विधानसभा निवडणुका सुरू आहेत. काँग्रेसच्या प्रचारसभा सुरू आहेत, आज रविवारी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे जसरोटा विधानसभा मतदारसंघातील बरनोटी येथे भाषण करताना आकस्मिकरित्या बेशुद्ध होऊन ते स्टेजवर पडले. त्यांना काही मिनिटे भाषण थांबवावे लागले.
काही वेळ ते खाली बसले आणि काही मिनिटे भाषण केले, पण मध्येच थांबले. नंतर त्यांनी उभे राहून २ मिनिटे भाषण केले. निघताना त्यांनी सर्वांना उद्देशून सांगितले की, मी ८३ वर्षांचा असून अजून मरणार नाही. मोदींना सत्तेवरून हटवल्याशिवाय मरणार नाही, असे ते म्हणाले.
काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, या लोकांना कधीही निवडणुका घ्यायच्या नाहीत. त्यांना हवे असते तर एक-दोन वर्षात निवडणुका घेता आल्या असत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली. त्यांना लेफ्टनंट गव्हर्नरच्या माध्यमातून रिमोट-नियंत्रित सरकार चालवायचे होते.
पंतप्रधान मोदींनी गेल्या १० वर्षात भारतातील तरुणांना काहीही दिले नाही. १० वर्षांत तुमची समृद्धी परत आणू शकत नाही अशा व्यक्तीवर तुम्ही विश्वास ठेवू शकता का? भाजपचा कोणताही नेता तुमच्यासमोर आला तर त्याला विचारा की, त्यांनी समृद्धी आणली की नाही, असेही खरगे म्हणाले.
काँग्रेसचे सरचिटणीस गुलाम अहमद मीर यांनी सांगितले की, मल्लिकार्जुन खरगे सभेला संबोधित करत होते तेव्हा त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि चक्कर आली. त्यांच्या सहका-यांनी त्यांना खुर्चीवर बसण्यास मदत केली, खरगे यांची प्रकृती स्थिर असल्याचे काँग्रेसचे सरचिटणीस गुलाम अहमद मीर म्हणाले.