विरोधी पक्षनेतेपद मिळणार?, ठाकरे गटाचे विधानसभा अध्यक्षांना पत्र
मुंबई : प्रतिनिधी
विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद ठाकरे गटाला मिळणार असून भास्कर जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. भास्कर जाधव हे आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते असतील. यासंबंधीचे पत्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना देण्यात आले. महाविकास आघाडीत याबाबत अडीच वर्षांचा फार्म्युला ठरलेला नाही, असे यासंदर्भात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले. दरम्यान, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेपद आपल्याला मिळावे, अशी मागणी काँग्रेसने केल्याची माहिती आहे.
विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक असलेले संख्याबळ हे महाविकास आघाडीतील तीनही पक्षाकडे नाही. त्यामुळे आतापर्यंत विधानसभा विरोधी पक्षनेत्याचा निर्णय झाला नव्हता. परंतु आता ठाकरे गटाच्या वतीने विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्यात आला आहे. त्यावर अंतिम निर्णय हा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घेणार आहेत.
विधानसभा विरोधी पक्षनेते पदावर ठाकरे यांची शिवसेना दावा करत असेल तर काँग्रेस विधान परिषद विरोधी पक्षनेते पदावर दावा करणार असल्याची माहिती आहे तर विधानसभा विरोधी पक्षनेतेपद अडीच-अडीच वर्षे मिळावे, अशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. जर ठाकरेंच्या शिवसेनेला विधानसभा आणि काँग्रेसला विधान परिषद विरोधी पक्षनेते पद मिळत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षसुद्धा विधानसभा विरोधी पक्षनेतेपदाच्या अडीच वर्षाची मागणी करत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. परंतु खुद्द उद्धव ठाकरे यांनी ही शक्यता फेटाळून लावली.
मविआ म्हणून एकत्र निर्णय घेणार
काँग्रेस असो किंवा राष्ट्रवादी असो, महाविकास आघाडी म्हणून या पुढची वाटचाल आम्ही एकत्र करणार आहोत. इतरसुद्धा ज्या काही गोष्टी आहेत, त्याबद्दलही चर्चा सुरू आहे. यापुढेही चर्चा करू. आम्ही एकत्रितपणे याबद्दल निर्णय घेत राहू. पण आज विधानसभा अध्यक्षांकडे विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी आम्ही भास्करराव जाधव यांच्या नावाची शिफारस केली आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.