31.6 C
Latur
Thursday, April 17, 2025
Homeमहाराष्ट्रभिक्षेक-यांच्या मृत्यूचा मुद्दा तापला

भिक्षेक-यांच्या मृत्यूचा मुद्दा तापला

अहिल्यानगर : प्रतिनिधी
शिर्डी येथील चार भिक्षेक-यांच्या जिल्हा रुग्णालयातील मृत्यूच्या घटनेनंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकारण तापू लागले आहे. भाजप मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर विरोधकांनी निशाणा साधण्यास सुरुवात करत, थेट राजीनाम्याची मागणी केली आहे.

खासदार निलेश लंके यांनी माजी खासदार सुजय विखे यांचे नाव टाळून जोरदार टीका केली. एका युवा नेत्यामुळे कधी नव्हे ते भिक्षेक-यांवर कारवाई झाली आणि त्यांना कारागृहात डांबून ठेवले. आता प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे त्यांचा बळी गेला, अशी टीका केली.

खासदार निलेश लंके यांनी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या भिक्षेक-यांची भेट घेतली. जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. नागेश चव्हाण देखील यावेळी उपस्थित होते. चार भिक्षेक-यांच्या मृत्यूची माहिती घेतल्यानंतर, खासदार लंकेंचा पारा चढला. प्रशासनाच्या कारभारावर ताशेरे ओढताना, हे प्रशासनाच्या हलगर्जीपणाचे बळी आहेत, असा घणाघात केला.

खासदार लंके यांनी भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांचे नाव टाळत, एका युवा नेत्याच्या मागणीवरून कधी नव्हे, ती भिक्षेक-यांवर कारवाई झाली. त्यांना कारागृहात डांबून ठेवण्यात आले. या बळींची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न केला. उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या भिक्षेक-यांपैकी तीन जण पळून गेले आहेत, त्यांची जबाबदारी कोणाची? असा सवाल देखील खासदार लंकेंनी केला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव म्हणाले, हा मुद्दा गंभीर आहे. भिक्षेक-यांचा जीव गेला अन् समिती नेमून काय होणार आहे. कोणत्या समितीचा अहवाल येत नाही. कोणती गंभीर कारवाई होत नाही. परंतु ही घटना गंभीर आहे. मंत्री राधाकृष्ण विखे यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. जबाबदारी न स्वीकारल्यास शिवसेना आंदोलन उभारणार असल्याचा इशारा देखील गिरीश जाधव यांनी दिला.

साई संस्थानच्या दोन कर्मचा-यांच्या हत्येनंतर शिर्डीतील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी जिल्हा पोलिस दल, नगर परिषदेने अवैध व्यवसायिकांविरोधात मोहीम सुरू केली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि माजी खासदार सुजय विखे यांनी या हत्येनंतर शिर्डीतील अवैध व्यावसायिकांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली होती.

७२ भिक्षेक-यांना ताब्यात घेतले
यातून शिर्डीतील भिक्षेक-यांविरोधात देखील कारवाई झाली. भाविकांना अडवून, त्यांच्याकडून पैसे घेऊन नशा करणा-या ६० पुरुष आणि १२ महिला, अशा एकूण ७२ भिक्षेक-यांना प्रशासनाने ताब्यात घेतले होते. या भिक्षेक-यांची आरोग्य तपासणी करत, त्यांना न्यायालयाच्या आदेशाने विसापूर (ता. श्रीगोंदा) इथल्या बेगर होममध्ये ठेवण्यात आले होते. त्यातील दहा भिक्षेक-यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातीलच चौघांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR