15.8 C
Latur
Friday, November 21, 2025
Homeधाराशिवभीषण अपघातात ४ भाविक ठार

भीषण अपघातात ४ भाविक ठार

उमरगा तालुक्यात अपघात, आणखी २ अपघातांत चौघांचा मृत्यू
उमरगा : प्रतिनिधी
देवदर्शन करून कारने आपल्या गावी बिदरकडे परत निघालेल्या चौघांवर काळाने घाला घातला. दाट धुक्यामुळे दुस-या बाजूने भरधाव येणा-या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि ही कार गावी जाणा-या भाविकांच्या कारला धडकली. मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर दाळिंब (ता. उमरगा) शिवारात ही दुर्घटना घडली. या अपघातात बिदर जिल्ह्यातील चौघे जागीच ठार झाले तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात तिघे तर जालना जिल्ह्यात एका महिलेचा मृत्यू झाला. ऐन दिवाळीत ३ अपघातांत ८ जणांना जीव गमवावा लागला.
कर्नाटकमधील बिदर जिल्ह्यातील भाविक सोमवारी (केएल ३८ एम ९९४६) या कारने सोलापूर जिल्ह्यातील हुलजंती (ता. मंगळवेढा) येथील महालिंगराया देवस्थानच्या दर्शनासाठी गेले होते. देवदर्शन करून गावाकडे परत जात असताना मंगळवार, दि. २१ ऑक्टोबर रोजी सकाळी सोलापूर-हैदराबाद महामार्गावर दाळिंब ते शिवाजीनगर तांडा दरम्यान सोलापूरच्या दिशेने भरधाव जाणा-या टाटा सफारीच्या (एमएच १४ ईपी ०७३२) चालकाचा कारवरील ताबा सुटला. भरधाव कार महामार्गावरील दुभाजकाला धडकून हवेत उडाली आणि दुभाजकाच्या दुस-या बाजूने समोरून येणा-या भाविकांच्या कारवर आदळली. त्यामुळे भाविकांची कार खड्डयात फेकली गेली.

या भीषण दुर्घटनेत रतिकांत मारुती बसगौडा (३०), शिवकुमार चितानंद वग्गे (२६), संतोष बजरंग बसगौडा (२०), सदानंद मारुती बसगौडा (१९, चौघेही रा. खाशमपूर (पी), ता. जि. बिदर) या भाविकांचा मृत्यू झाला तर कारचालक दिगंबर जगन्नाथ संगोळगी (३१, रा. खाशमपूर), सफारी चालक लावण्य हणमंत मसुती (२२, रा. सोलापूर) दोघे गंभीर जखमी झाले. मृतांमधील चौघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उमरगा उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. त्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात दिले तर जखमींना सोलापूर आणि बिदरला हलविण्यात आले.

कोल्हापूर जिल्ह्यात
कुटुंबातील तिघे ठार
ऐन दिवाळीत कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील तरसंबळेच्या भावा-बहिणींवर काळाने आघात केला आहे. कोल्हापूर-राधानगरी रोडवरील कौलव गावाजवळ आयशर टेम्पो आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील ३ जणांचा मृत्यू झाला. या घटनेनमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. श्रीकांत कांबळे (३०, रा. तरसंबळे), दीपाली गुरुनाथ कांबळे (२८, रा. शेंडूर ता. कागल) या सख्ख्या बहीण भावासह ३ वर्षीय शिवद्या सचिन कांबळेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर अथर्व गुरूनाथ कांबळे या गंभीर जखमी झालेल्या १० वर्षीय मुलावर सीपीआरमधील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

जालन्यात एकाचा मृत्यू
जालना जिल्ह्यातील राजूर गाव (ता. भोकरदन) परिसरात सोमवारी रात्री ९ च्या सुमारास भरधाव ट्रकने एका दुचाकीला भीषण धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील महिला ठार झाली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR