लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्राचेच नाही तर संपूर्ण भारताचे आराध्यदैवत असलेले रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती मोठया उत्साहाने जगभरात साजरी करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर लातूरच्या संशोधक विद्यार्थ्यांनी औसा भुईकोट किल्यावर स्वच्छता अभियान राबविण्यात आली.
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे चे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे व श्रीकांत देशमुख यांनी पीएच.डी. करणा-या संशोधक विद्यार्थ्यांना झूम मीटिंगद्वारे शिवरायांचे गड किल्ले संवर्धन करून स्वच्छता अभियान राबविण्याचा सल्ला दिला होता. याच अनुषंगाने सारथी विभागीय कार्यालय, लातूरचे उपव्यवस्थापकीय संचालक राहुल जाधव, प्रकल्प अधिकारी असलम शेख व ज्योती ढगे यांनी गड किल्ले संवर्धन, ऐतिहासिक वारसाचे जतन, प्रेरणादायी इतिहासाची नवीन पिढीला माहिती, त्याचबरोबर व्यक्तीचे सामाजिक दायित्व लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना वेळोवेळी गड किल्ले संवर्धन करून व स्वच्छता अभियान राबवून शिवरायांचा इतिहास जतन करण्याबाबत मार्गदर्शन केले. लातूरच्या जवळ असलेला औसा येथील भुईकोट किल्ल्यावर लातूरच्या वेगवेगळ्या महाविद्यालयात पीएचडी करणा-या विद्यार्थ्यानी औसा येथील भुईकोट किल्ल्यावरील कचरा उचलून परिसर स्वच्छ केला आहे.
दि. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजल्यापासून या अभियानाला सुरुवात केली होती. अवघ्या काही तासात येथील कचरा जमा करून न.प.च्या साह्याने कच-याची विल्हेवाट लावण्यात आली. यावेळी लातूर मधील दयानंद कला, विज्ञान महाविद्यालय, शाहू महाविद्यालय, बसवेश्वर महाविद्यालय येथील वेगवेगळया विषयात पी.एच.डी चे संशोधन करणारे विद्यार्थी सागर यादव, महेशकुमार जाधव, पवन भोसले, जगन्नाथ कदम, प्रमोद बचिफले, नरसिंग शिंदे, यांच्यासह शेकडो संशोधक विद्याथ्यांची उपस्थिती होती.