पुणे : प्रतिनिधी
मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या शपथविधीत ओबीसी नेते छगन भुजबळ यांना स्थान न देऊन त्यांच्यावर आणि पर्यायाने ओबीसी समाजावर केलेल्या अन्यायाविरोधात सकल ओबीसी समाज पुणे आणि पिंपरी चिंचवडतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाविरोधात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ‘जोडे मारो निषेध आंदोलन’ करण्यात आले.
यावेळी छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ दिलेल्या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दुमदुमून गेला होता. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा निषेध करण्यासाठी ओबीसी कार्यकर्त्यांनी काळ्या रंगाचा पोषाख परीधान केला होता. यावेळी समता परिषदेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मंजिरी धाडगे, समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष प्रितेश गवळी, समता परिषदेचे पुणे शहर अध्यक्ष पंढरीनाथ बनकर आदी कार्यकर्त्यांसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छगन भुजबळ यांची ज्येष्ठता आणि त्यांच्यामागे उभी आसलेली ओबीसी समाजाची ताकद पाहता भुजबळ यांना मंत्रीमंडळात सन्मानाने स्थान द्यावे. यासाठी ओबीसी समाज पेटून उठला असून, संपूर्ण राज्यात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन उभे करेल असा, इशारा यावेळी देण्यात आला.
अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट करावी
भुजबळ यांना मंत्रीमंडळात स्थान न देऊन सरकारने मोठा अन्याय केला असून, सरकारने आणि खास करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. येत्या दोन दिवसांत याबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास येणा-या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी समाज मतांमधून आपला असंतोष व्यक्त करेल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.