27.2 C
Latur
Tuesday, May 20, 2025
Homeमहाराष्ट्रभुजबळ पुन्हा मंत्रिमंडळात

भुजबळ पुन्हा मंत्रिमंडळात

राज्यपालांनी दिली शपथ, अन्न व नागरी पुरवठा खाते मिळणार?
मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्या पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी आज राजभवनमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी त्यांना शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त जागेवर भुजबळ यांना स्थान देण्यात आले. छगन भुजबळ यांना पुन्हा अन्न व नागरी पुरवठा खाते देण्यात येण्याची शक्यता आहे. तिस-यांदा भुजबळ यांच्याकडे या खात्याची सूत्र जाणार आहेत.

विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात छगन भुजबळ यांचा समावेश झाला नव्हता. त्यामुळे छगन भुजबळ प्रचंड नाराज झाले होते. त्यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली होती. मंत्रिपद न मिळाल्याने भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्त्वापासून आणि पक्षीय घडामोडींपासून लांब राहिले होते. आता त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी ७ दिवसांपूर्वीच छगन भुजबळ यांना पुन्हा मंत्री करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यासंदर्भातील निर्णय भुजबळ यांना कळवला होता. भुजबळ यांनी त्याला दुजोरा दिल्याने मंत्रिपदावर वर्णी लागली.

धनंजय मुंडे नाराज?
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या मंत्रिपदावर छगन भुजबळांची वर्णी लागली. त्यानंतर धनंजय मुंडे नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. मुंडे यांनी मंगळवारी रात्री उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. त्यानंतर हे दोन्ही नेते देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेले. मुंडे यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR