मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्याने ते नाराज आहेत. भुजबळ गेल्या चार दिवसांपासून नाराज आहेत, तरीही अजित पवार गटाकडून त्यांची कुठलीही दखल घेण्यात आली नाही, अशी माहिती आहे. गेल्या दोन दिवसांपासून भुजबळ मुंबईत असून एकाही नेत्याने त्यांची भेट घेतली नसल्याने समर्थकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
दरम्यान, छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात वरिष्ठ नेते आहेत. मंत्रिमंडळातून डावलूनही चर्चा करत नसल्याने समर्थक अजित पवार यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत. नाराजीमुळे भुजबळ यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाकडे पाठ फिरवली. आज हिवाळी अधिवेशनाची सांगता असल्याने सायंकाळी अजित पवार गटाकडून भुजबळ यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, अशी माहिती अजित पवार गटाच्या नेत्यांनी दिली आहे.
सबुरीचा संदेश देण्यात आला !
तर दुसरीकडे भुजबळविरोधी गटाला शांततेचा संदेश अजित पवार समर्थकांकडून देण्यात आला आहे. छगन भुजबळ समर्थकांनी अजित पवार यांच्या प्रतिमेला जोडे मारल्यानंतरही राष्ट्रवादीच्या गटाने कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. राष्ट्रवादीमधील भुजबळविरोधी गटाने भुजबळ समर्थकांना उत्तर देण्याची तयारी चालवली होती. मात्र अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सबुरीचा संदेश दिल्याची माहिती आहे.