38.4 C
Latur
Monday, March 31, 2025
Homeअंतरराष्ट्रीयभूकंपाच्या तीव्र धक्क्याने म्यानमार, थायलंड हादरले

भूकंपाच्या तीव्र धक्क्याने म्यानमार, थायलंड हादरले

इमारती जमीनदोस्त, सर्वत्र हाहाकार, १४४ जणांचा मृत्यू
मंडाले : वृत्तसंस्था
म्यानमार आणि थायलंड शुक्रवारी ७.७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे हादरे बसले. या धक्क्याने दोन्ही देशात हाहाकार उडाला. म्यानमारमध्ये ५ शहरांतील इमारती जमीनदोस्त झाल्या. यंगून-मंडाले एक्स्प्रेस वेवरील रेल्वे पूल, रस्ताही कोसळला. यात म्यानमारमध्ये १४४ लोकांचा बळी गेला, तर ७३२ लोक जखमी झाले. म्यानमारसोबत थायलंडमध्येही मोठे नुकसान झाले. थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये एक गगनचुंबी इमारत कोसळली. यात ८१ लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. भूकंपानंतर मदत व बचावकार्य सुरू करण्यात आले.

म्यानमार, बँकॉक, थायलंडमध्ये शुक्रवारी दुपारी ७.७ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. भूकंपाची तीव्रता अधिक असल्याने अनेक भागात मोठा हादरा बसला. त्यामुळे ठिकठिकाणी इमारती जमीनदोस्त झाल्या. म्यानमारमधील ५ शहरांत मोठे नुकसान झाले. भूकंपानंतरची भीषण दृश्ये समोर येत आहेत. म्यानमार आणि बँकॉकमध्ये अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या तर मंडालेमधील प्राचीन बौद्ध मंदिरांचेही मोठे नुकसान झाले. रेल्वे, रस्त्यांचे पूलही जमीनदोस्त झाले.

शुक्रवारी दुपारच्या सुमारास ७.७ रिश्टर स्केलच्या भूकंपाचे हादरे बसले. त्यापाठोपाठ ६.८ चे धक्के बसले. त्यामुळे लोकांमध्ये घबराट पसरली. अनेकजण इमारती, रेल्वे स्थानकातून बाहेर पडले आणि मोकळ््या जागेकडे धावू लागले. दरम्यान बँकॉकमधील एका मेट्रो स्थानकावरील ७ सेकंदाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. मेट्रो स्थानकावरील व्हिडीओमध्ये प्रवाशी एकमेकांना पकडून वर्तुळात उभे असल्याचे दिसत आहे तर समोरच उभी असेलली मेट्रो ट्रेन गदागदा हलताना दिसत आहे. ट्रेन चालू नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. तसेच बँकॉकमध्ये एका निर्माणाधीन इमारतीचा कोसळतानाचा व्हिडीओही समोर आला आहे. बांधकाम सुरू असलेली गगनचुंबी इमारत अवघ्या काही सेकंदात जमीनदोस्त झाली.

युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी १२.५० दरम्यान भूकंपाचा धक्का जाणवला. भूकंपाचा केंद्रबिंदू मंडाले शहरापासून वायव्येकडे १७.२ किमी अंतरावर होता.

बँकॉकमध्ये गगनचुंबी
इमारत कोसळली
भूकंपाच्या तीव्र धक्क्याने बँकॉकमधील एक बांधकाम सुरू असलेली गगनचुंबी इमारत कोसळली. ही इमारत कोसळल्यानंतर त्याखाली ४३ लोक अडकले आहेत. दरम्यान म्यानमार येथे आलेल्या या भूकंपानंतर सोशल मीडीयावर याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये रस्त्यांवरील लॅम्पपोस्ट जोरजोरात हलताना दिसत आहेत.

दिल्लीतही धक्के
भारतातील दिल्ली आणि दिल्ली एनसीआरमध्ये या भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. दिल्लीत या तीव्र धक्क्यामुळे कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR