औसा : प्रतिनिधी
मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात असून मराठा समाजाने संयम पाळून मराठा व ओबीसी समाजात वाद होऊन दंगली व्हाव्यात हा छगन भुजबळांचा डाव हाणून पाडा, असे आवाहन मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. औसा येथील उटगे मैदानावर गरजवंत मराठा समाजाच्या वतीने दि. १० डिसेंबर रोजी आयोजित विराट जाहीर सभेत मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील बोलत होते. पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले, आता मराठा समाजाला आरक्षणापासून कोणीही दूर ठेवू शकणार नाही, याची खात्री भुजबळांना झाली असल्यामुळेच मराठा व ओबीसीत वाद व्हावा. भांडणे व्हावीत, अशी चितावणीखोर वक्त्तव्य केली जात आहेत.
आता मराठा समाजावर मोठी जबाबदारी आली आहे. शांतता व सयंम पाळून भुजबळांचा डाव हाणून पाडायचे आहे. केवळ मराठा आरक्षण हेच आपले ध्येय असले पाहिजे. या ध्येयापासून कोणीही दूर भटकवायचा प्रयत्न करु नये. येत्या २४ डिसेंबरपर्यत आरक्षण मिळणारच आहे. समाजाने एकसंघ राहून गावागावात जनजागृती करावी. विशेषत: महिलांनी गावागावात जावून जनजागृती करावी, असे आवाहन केले. मराठा समाज शांत आहे. त्यास शांतच राहू द्या. मराठा समाजातील लेकरांच्या भविष्यासाठी आम्ही आरक्षण मागत आहोत. कोणावरही आम्ही अन्याय करत नाहीत. आमच्या पुढच्या पिढीसाठी आम्ही आमच्या हक्काच मागत आहोत. शासनाने २४ डिसेंबरपर्यत याबाबत आपली जबाबदारी पार पाडावी व आरक्षणाचा विषय संपवावा, असे आवाहन केले.
औसा येथील सभेस येताना रस्त्यात शिवली मोड, बोरफळ, येथे जरांगे पाटील यांचे स्वागत करण्यात आले. औसा शहरात प्रवेश केल्यानंतर किल्ला मैदानावर मुस्लिम समाजाच्या वतीने स्वागत करण्यात आले. शहराच्या मुख्य रस्त्यावरुन जागोजागी पुष्पवृष्टी करण्यात येत होती. गांधी चौकात लिंगायत समाजाच्या वतीने पुष्पवृष्टी करुन स्वागत करण्यात आले. उटगे मैदानावर २० फुट उंच उभारलेल्या व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनावर आरुढ पुतळ्यास व स्व. अण्णासाहेब जावळे यांच्या प्रतिमेस मनोज जरांगे पाटील यांनी अभिवादन केल्यानंतर सभेत तालुक्यातील मराठा समाजातील विद्यार्थी, विद्यार्थीनींनी स्वागत केले. जिजाऊ वंदना झाल्यानंतर जरांगेची तोफ धडाडली.
या सभेस तालुक्यातील मराठा समाज मोठ्या संख्येनी उपस्थित होता. हजारो स्वयंसेवक शहरात दिवसभर जागोजागी थांबून नागरीकांना पाणी व अल्पोपहाराची व्यवस्था करुन सहकार्य करीत होते.