विकासाला मत देऊन दीपाली-वैशाली जोडीला निवडून द्या : धिरज देशमुख
लातूर : प्रतिनिधी
जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, साखर कारखान्याच्या माध्यमातून चांगली काम होत आहेत. शेतकरी हितासाठी जिल्हा बँकेने सोसायटीचे लिमिट वाढविले, या भागात बंद पडलेला साखर कारखाना सुरू करून शेतक-यांच्या उसाला चांगला भाव देण्याचे काम मांजरा परिवार करीत आहे. इतकी सारी चांगली कामे होत असताना आपली निष्क्रियता झाकून ठेवण्यासाठी विरोधी पक्षांची मंडळी बिनबुडाचे आरोप करून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, या भूलथापांना बळी न पडता आपल्या भागाचे प्रश्न सोडविण्यासाठी कॉंग्रेस पक्षाला साथ द्यावी आणि मातोळा जिल्हा परिषद गट आणि गणातून सौ दिपाली श्याम भोसले आणि वैशाली इंद्रजित घोडके या जोडीला मोठ्या मताधिक्क्याने निवडून द्यावे, असे आवाहन माजी आमदार तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांनी केले.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक २०२६ च्या निमित्ताने मातोळा गटातील कॉंग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ. दिपाली श्यामबापू भोसले आणि मातोळा गणाच्या उमेदवार सौ. वैशाली इंद्रजित घोडके यांच्या प्रचारार्थ हिप्परगा (ता. औसा) येथे आयोजित प्रचार सभेत धिरज देशमुख बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी सरपंच तथा गावचे ज्येष्ठ नागरिक केशव भोजने, माजी सरपंच व्यंकटराव पाटील, संत शिरोमणी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्यामबापू भोसले, मातोळा गटाच्या उमेदवार सौ. दिपाली भोसले आणि मातोळा गणाच्या उमेदवार वैशाली घोडके यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. या सभेसाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ महिला, पुरुष उपस्थित होते.
या भागात सहकारी सोसायटी आणि साखर कारखान्याच्या माध्यमातून चांगली कामे होत आहेत. सहकारी सोसायटीची मर्यादा वाढविली आहे. तसेच कारखान्याद्वारे उसाचे गाळप वेळेत होत आहे. उसाला भावही मिळत आहे आणि शेतक-यांच्या खात्यात वेळेत पैसेही मिळत आहेत. असे असताना विरोधक भूलथापा मारून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, हे सर्व त्यांची निष्क्रियता झाकण्यासाठी करीत आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समितीत प्रशासकराज आणून आपल्या भागाचा विकास तुंबविला. सत्ताधा-यांच्या लाडक्या कंत्राटदारांनी आपल्या गावाच्या नावावर पैसे आणले. पण विकास केला नाही. परंतु कॉंग्रेस पक्षाने नेहमीच जनतेचे, आपल्या लोकांचे हित पाहिले आहे. आता जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतही आम्ही दीपाली आणि वैशाली या जोडीच्या रूपाने सक्षम पर्याय दिला आहे. आपल्या भागाचे प्रश्न सोडविण्यासाठी या दोन्ही उमेदवारांना मोठ्या मताधिक्क्याने निवडून द्यावे, असे धिरज देशमुख म्हणाले. या कार्यक्रमाला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

