भेटा : श्रीधर माने
औसा तालुक्यातील भेटा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेची दुरवस्था झाली असून वर्गखोल्यांना गळती लागली आहे. इमारतीच्या छताचे प्लास्टर निखळत असून त्या अवस्थेत विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत आहे. या केंद्रीय शाळेतील पटसंख्येचा विचार केला असता तालुक्याचा दुसरा नंबर लागतो. पटसंख्या चांगली आहे परंतु या शाळेची दूरवस्था झाली आहे. संरक्षक भिंत नाही सर्व काही पडलेली आहे.
नवीन इमारत बांधकाम करण्याची गरज आहे. शाळेची इमारत नवीन करण्याची गरज आहे. शाळेत एकूण सोळा खोल्या असून चार खोल्या स्लॅबच्या राहिलेल्या सर्व खोल्या पत्र्याच्या आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे केंद्रीय शाळेची स्थापना १९५६ सालची असून त्यावेळी बांधकाम करण्यात आलेले आहे. १९९३ च्या भूकंपात काही भागास तडे गेल्याने जीर्ण झाली होती. त्यावेळी नवीन इमारत न बांधता आर्धी पाडून त्यावर बांधकाम करून फक्त दुरुस्ती करून रंगरंगोटी करण्यात आली. ६७ वर्ष होऊन गेल्याने पत्र्याची इमारत जुनी असून धोकादायक झाली आहे. स्लॅबला गळती लागल्याने वर्गात ओलावा निर्माण होत आहे.त्यामुळे अध्यापन करणे अशक्य होत आहे. इयत्ता सहावी, सातवी,आठवीच्या वर्गांना गळती लागली आहे तीन वर्ग पावसामुळे गळत असून याचा अहवाल वरिष्ठांना पाठवणार आहोत, मुख्याध्यापक नजीर मुजावर यांनी सांगितले.