मुंबई : प्रतिनिधी
भैय्याजी जोशी यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. महाराष्ट्रात फूट पाडणारे हे लोक अनाजीपंत आणि औरंगजेब आहेत. ते मराठी-अमराठी विष कालवण्याचा प्रयत्न करत आहेत. कोणी कितीही विष कालवण्याचा प्रयत्न केला तरी मुंबई महाराष्ट्रापासून हिसकवू देणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, मुंबईत विविधतेमध्ये एकता आहे. मुंबई शहरात विविध राज्यांतील नागरिक राहतात. त्यामुळे त्यांची वेगवेगळी भाषा आहे. घाटकोपरची भाषा गुजराती आहे, त्यामुळे मुंबईत येणा-या प्रत्येकाला मराठी शिकले पाहिजे, असे नाही, असे वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यावर चौफेर हल्ला होत आहे. शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भैय्याजी जोशी यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, काल अनाजीपंत म्हणजे भैय्याजी जोशी येऊन गेले. त्यांनी मुंबईत येऊन सांगितले की, मुंबईत राहणा-यांना मराठी आलीच पाहिजे, असे नाही. त्यांच्या या वक्तव्यावरून संघाचा हा छुपा अजेंडा आहे का? संघाचे दाखवण्याचे दात वेगळे आहेत आणि खाण्याचे दात वेगळे आहेत का?. ‘बटेंगे तो कटेंगे’ म्हणतात. त्या ‘बटेंगे तो कटेंगे’चा अर्थ म्हणजे हिंदू-मुस्लिम नाही. मराठी-अमराठी आणि मराठा आणि अमराठा असा आहे. ते असा द्वेष निर्माण करून वाटणी करणार आहे. त्या अनाजीपंतांनी मुंबईत जी अशी भाषा केली ती दक्षिण भारतात करून दाखवावी. गुजरातमध्ये करून दाखवावी, त्यानंतर महाराष्ट्रात सुखरूप येऊन दाखवावे, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी केले.
उद्धव ठाकरे म्हणाले, भैय्याजी जोशी यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. महाराष्ट्रात फूट पाडणारे हे लोक अनाजीपंत आणि औरंगजेब आहेत. ते मराठी-अमराठी विष कालवण्याचा प्रयत्न करत आहेत. कोणी कितीही विष कालवण्याचा प्रयत्न केला तरी मुंबई महाराष्ट्रापासून हिसकावू देणार नाही. मुंबई तोडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. भाषावार प्रांतरचना देशाची झाली. आता हे मुंबईची प्रांतरचना करत आहेत.