23.6 C
Latur
Saturday, October 5, 2024
Homeसोलापूरभैय्या चौकातील अवजड वाहतूक बंद,रेल्वेने लोखंडी बार लावले

भैय्या चौकातील अवजड वाहतूक बंद,रेल्वेने लोखंडी बार लावले

सोलापूर: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकातील (भय्या चौक) रेल्वे उड्डाणपुलाला १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. या पुलावरील अवजड वाहतूक बंद करावी, असे पत्र मध्य रेल्वेने एक वर्षापूर्वी महापालिकेला दिले होते. या प्रकरणात महापालिकेने हात झटकल्यामुळे रेल्वे अधिकाऱ्यांनी भय्या चौक ते मरिआई चौकात लोखंडी बार लावून अवजड वाहतूक बंद केली.

राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून रेल्वे उड्डाणपुलाचे काम होणार आहे. एक वर्षापूर्वीच या कामाची निविदा निश्चित झाली. रेल्वे अधिकारी आणि महामार्ग अधिकाऱ्यांमध्ये सुप्त संघर्ष सुरू आहे. या संघर्षामुळे या पुलाचे काम प्रलंबित असल्याचे या दोन्ही विभागांतील सूत्रांचे म्हणणे आहे. एक वर्षापूर्वी रेल्वेने महापालिकेला पत्र पाठवले. या पुलाचे आयुष्यमान संपले आहे.

या पुलावरून होणारी अवजड वाहतूक बंद करावी. महापालिका आणि पोलिसांनी ही कारवाई करावी, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी म्हटले होते. यासंदर्भात मनपा आयुक्तांकडे बैठकाही झाल्या. उड्डाणपूल रेल्वेची मालमत्ता आहे. त्यामुळे रेल्वेनेच ही वाहतूक बंद करावी, अशी भूमिका मनपाकडून घेण्यात आली. अखेर रेल्वे अधिकाऱ्यांनीच दोन्ही बाजूला लोखंडी बार लावले व अवजड वाहनांनी इतर मार्गाने जावे, असे सुचना फलकही लावले.

भय्या चौक ते मरिआई चौक हे अंतर सुमारे ४०० मीटर आहे. या चौकातून एखादे अवजड वाहन थेट दमाणी नगर, शेटे वस्ती, जुनी मिल भागात येऊ शकणार नाही.
मंगळवेढा, सांगोला, कोल्हापूरकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना छत्रपती शिवाजी महाराज चौक ते केगाव उड्डाण ते देगाव या मार्गे ये-जा करावी लागेल. अंतर सुमारे १८ किलोमीटरचे आहे.
एक वर्षापुर्वीच अवजड वाहतूक बंद करून उड्डाणपुलाचे काम सुरू करणे आवश्यक होते. या एक वर्षात पुलाचे नुकसान झाले. आता अवजड वाहतूक बंद केली तर उड्डाणपुलाचे काम लवकर सुरू करायला हवे.अशी नागरीकांची मागणी आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR