17.7 C
Latur
Thursday, March 6, 2025
Homeमहाराष्ट्रमंत्रिपदासाठी रस्सीखेच

मंत्रिपदासाठी रस्सीखेच

चिखलीकर, बनसोडे, सोळंके, चव्हाण यांची फिल्डिंग
छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
मस्साजोगचे दिवंगत माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील निर्घृणतेची छायाचित्रे समोर आल्यानंतर अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला. यामुळे एकाच जिल्ह्यातील दोन मंत्री पदे देण्याचा असमतोल दूर करण्याची संधी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडे असल्याची चर्चा सुरू झाली. ‘राष्ट्रवादी’च्या वाट्यातील मराठवाड्याच्या रिक्त झालेल्या जागेवर प्रताप पाटील चिखलीकर, माजी मंत्री संजय बनसोडे, ज्येष्ठ नेते प्रकाश सोळंके यांच्यासह विधान परिषदेतील आमदार सतीश चव्हाण यांनी आपली वर्णी लागावी, यासाठी पाऊले उचण्यास सुरुवात केली असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. दरम्यान कारवाईनंतरचा धुराळा शांत होईपर्यंत हे खाते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेच राहिल, असे सांगण्यात येत आहे.
धनंजय मुंडे पालकमंत्री असताना बीडच्या प्रशासकीय यंत्रणामध्ये आरोपी वाल्मिक कराड याचा शब्दच अंतिम मानला जात असे. कराड यास अटक झाल्यानंतर मुंडे यांच्या कार्यशैलीवर सातत्याने प्रश्नचिन्ह उभे केले जात होते. परळीमधील औष्णिक वीज केंद्रातून होणारा अवैध व्यवहार, पीक विमा घोटाळा, हार्वेस्टरचा घोटाळा असे अनेक आरोप करण्यात आले. जिल्हा वार्षिक आराखड्यात निधीचे असमान वाटप यावरुन तर विधिमंडळाच्या सभागृहात धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करण्यात आले. यामध्ये सुरेश धस यांच्याबरोबर प्रकाश सोळंके यांचाही हात होता.

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर मुंडे यांच्या कार्यशैलीवर निर्माण झालेले प्रश्नचिन्ह अद्याप कायम आहे. मात्र, त्यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीमधील राजकीय हालचालींना वेग आला आहे. माजी क्रीडामंत्री संजय बनसोडे अजित पवार यांच्या जवळचे मानले जातात. भाजपमधील नेत्यांशीही त्यांचे चांगले संबंध आहेत. केवळ निवडणुकीपुरते शरद पवार गटात गेलेले सतीश चव्हाण यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. धाराशिवसह मराठवाड्यातील विस्तारासाठी पदवीधर मतदारसंघातील चव्हाण उपयोगी पडू शकतात, असा दावा केला जात आहे. माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके हेही राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असल्याने त्यांचाही या पदासाठी दावा असू शकतो, या वेळी ते सलग तिस-यांदा निवडून आले आहेत.

मराठवाड्यालाच
मिळू शकते मंत्रिपद?
नव्याने राष्ट्रवादीमधून निवडून आलेले लोह्याचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनाही संधी मिळू शकेल, असा दावा केला जात आहे. रिक्त जागा भरताना मराठवाड्यातून वजा झालेले मंत्री पद याच भागात राहावे, यासाठी नेत्यांनी प्रयत्न करायला सुरुवात केली. त्यामुळे एका रिक्त पदावर खूप जणांचा दावा असू शकतो. तशा पडद्यामागच्या हालचालींना सुरुवात झाली आहे. यातील काही इच्छुकांनी अजित पवार यांना भेटण्यासाठी वेळ मागितली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR