मुंबई : राज्याच्या राजकारणात नेहमीच नाराजी आणि खडाजंगी दिसून येते. मात्र, आता एकाच पक्षातील मंत्री आणि खासदार यांच्यात शिवीगाळ आणि खडाजंगी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. शिवसेनेचे (शिंदे गटाचे) मंत्री अब्दुल सत्तार आणि खासदार हेमंत पाटील यांची एकमेकांना शिवीगाळ करण्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या ऑनलाईन बैठकीत दोघांमध्ये शिवीगाळ झाल्याची माहिती समोर आली आहे. अब्दुल सत्तार हे हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. तर हेमंत पाटील हे हिंगोलीचे खासदार आहेत.
हिंगोली जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीची बैठक ऑनलाईन पद्धतीने पार पडली. या बैठकीमध्ये निधी वितरित करण्याच्या कारणावरून आणि टक्केवारीच्या कारणावरून हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार आणि खासदार हेमंत पाटील यांच्यात चांगलीच खडाजंगी झाल्याचे दिसून आले. या दोन्ही नेत्यांनी एकमेकांना चक्क शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.
ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपवरून सामान्यांसह राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
दरम्यान, अब्दुल सत्तार यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात उत्साही तरुणांवर पोलिसांना लाठ्या चालवण्याचे आदेश जाहीरपणे दिले होते. यावेळी गर्दीला उद्देशून अर्वाच्य भाषेत शिवीगाळही केली होती. हे प्रकरण चर्चेत असतानाच, सत्तारांनी आता थेट आपल्याच पक्षाच्या खासदाराला दम भरल्याचा प्रकार समोर आला आहे.