मुंबई : प्रतिनिधी
राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांनी जामनेर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी आपल्या मालमत्तेचे विवरण असलेले प्रतिज्ञापत्र सादर केले. या प्रतिज्ञापत्रात महाजन यांच्या संपत्तीत लक्षणीय वाढ झाली आहे.
मंत्री गिरीश महाजन यांच्या उत्पन्नात गेल्या पाच वर्षांत लक्षणीय वाढ झाली आहे. प्राप्तिकर विभागाला सादर केलेल्या विवरणपत्रात २०२० मध्ये त्यांचे वार्षिक उत्पन्न ४५.५२ लाख रुपये होते. हे उत्पन्न यंदा २.१९ कोटी रुपये झाले आहे.
मंत्री महाजन यांच्या पत्नी देखील आयकर विवरणपत्र दाखल करतात. त्यांनी २०२० मध्ये आपले उत्पन्न ४.०९ लाख रुपये असल्याचे नमूद केले होते. सध्या ते १५.३४ लाख रुपये झाले आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत मंत्री महाजन यांच्या पत्नीच्या उत्पन्नात देखील लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले.
भाजप नेते मंत्री महाजन यांच्याकडे ९.२८ लाख रुपये आणि पत्नीकडे २.०२ लाखांची रोकड आहे. याशिवाय मंत्री महाजन यांचे विविध बँकांमध्ये १९.२५ आणि पत्नीच्या नावे १४.५५लाख रुपये जमा आहेत. विविध बँकांकडे असलेल्या एकूण जमा आणि ठेवी ४७.३२ लाख रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
मंत्री महाजन आणि त्यांच्या पत्नीकडे ८५० ग्रॅम सोने आणि चांदी असून त्यांचे एकत्रित मूल्य २.१२ कोटी रुपये आहे.
त्यांना त्यांच्या मामांनी जळगाव येथे घर बक्षीस दिले आहे. संपत्तीच्या विवरणपत्रात तसा उल्लेख करण्यात आला आहे. याशिवाय त्यांच्या विविध ठिकाणी शेतजमिनी तसेच वाणिज्यिक उपयोगाच्या जमिनी आहेत. मंत्री महाजन यांची जंगम मालमत्ता ५.६८ कोटी रुपयांची आहे. स्थावर मालमत्ता ४५ कोटींची तर त्यांच्यावर १.२२ कोटी रुपयांचे आणि पत्नी यांच्यावर २२.५२ लाखांची देणी आहेत. प्राप्तिकर विभागाला सादर केलेल्या त्यांच्या विवरणपत्रात गेल्या ५ वर्षांत सातत्याने वाढ होत गेली आहे. विशेषत: २०२० च्या तुलनेत यंदा त्यांचे उत्पन्न सहा पटींनी वाढले आहे, हे उल्लेखनीय म्हणता येईल.