17.5 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeलातूरमंदिर निर्मितीमागचा इतिहास समजून घेणे गरजेचे - डॉ. देगलूरकर

मंदिर निर्मितीमागचा इतिहास समजून घेणे गरजेचे – डॉ. देगलूरकर

लातूर : प्रतिनिधी
मंदिर हे  साधना व उपासनेचे केंद्र असले तरी या मंदिराचे निर्मिती मागचा इतिहास समजून घेणे गरजेचे आहे, मंदिर हे केवळ पूजास्थान नव्हे, तर ते आपल्या सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक आहे. असे प्रतिपादन प्रसिद्ध इतिहासतज्ञ मंदिर व मूर्तीशास्त्राचे जेष्ठ अभ्यासक व डेक्कन अभिमत विद्यापीठाचे माजी कुलपती गो. बं. देगलूरकर यांनी व्यक्त केले. जागतिक वारसा सप्ताहाच्या निमित्त आयोजित एका राष्ट्रीय चर्चासत्रात, प्रसिद्ध इतिहासकार डॉ. गो.बं. देगलूरकर यांनी महाराष्ट्रातील मंदिरांच्या निर्मितीमागचा इतिहास उलगडून दाखवला. यावेळी बोलताना त्यांनी महाराष्ट्राचा इतिहास, मंदिर निर्मिती, मुर्तीचे प्रयोजन इत्यादी विषयावर सखोल मार्गदर्शन केले. सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय,मुंबई अंतर्गत सहायक संचालक,पुरातत्त्व विभाग,पुणे  व इंडियन स्टुडंट कौन्सिल, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १९ ते २५ नोव्हेंबर दरम्यान साजरा केल्या जाणा-या जागतिक वारसा सप्ताह निमित्त राष्ट्रीय चर्चासत्राचे आभासी आयोजन दिनांक २५ नोव्हेंबर २०२४ रोजी करण्यात आले होते .
या राष्ट्रीय चर्चासत्राचा विषय महाराष्ट्राचा समृध्द वारसा हा होता. मार्गदर्शक म्हणून सुप्रसिद्ध इतिहासतज्ञ मंदिर व मूर्तीशास्त्राचे जेष्ठ अभ्यासक व डेक्कन अभिमत विद्यापीठाचे माजी कुलपती गो. बं देगलूरकर उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी मूर्तिशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक प्रभाकर देवसर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलतांना प्रा. प्रभाकर देवसर यांनी मराठवाड्यातील मंदिरे व मूर्तीशास्त्र यांचा इतिहास उलगडून सांगताना मराठवाड्यातील व्यापार परंपरा व त्या अनुषंगाने भारताचा रोम या प्राचीन साम्राज्याशी येणारा सहसंबंध याविषयी आपले मत मांडले. प्राचीन महाराष्ट्रातील समृद्धता, व्यापारी मार्ग, व्यापारीनगरे याविषयी माहिती दिली. वस्तुसंग्रहालयांचे इतिहासातील व मानवी जीवनातील महत्त्व अधोरेखित करतांना संशोधकांच्या शंकाचे निरसन केले.
या प्रसंगी प्रा. डॉ शिला स्वामी व प्रा. सिमा घोलप यांनी शोध निबंध वाचन केले. प्रसिद्ध इतिहासकार व जेष्ठ तज्ञ मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनामुळे हे चर्चासत्र फलदायी ठरले असे मत पुणे येथील पुरातत्व विभगाचे सहायक संचालक डॉ.विलास वाहणे यांनी व्यक्त केले तर या चर्चासत्रामुळे नव्याने इतिहासाची माहिती मिळाली असे मत माजी प्राचार्या मिता रामटेके यांनी मांडले. या राष्ट्रीय चर्चासत्रात इंडियन स्टुडंट कौन्सिलचे अध्यक्ष ज्ञानोबा कदम यांनी सर्वांचे स्वागत केले.
प्रा. माधुरी राऊत यांनी चर्चासत्राच्या आयोजनाचे प्रयोजन स्पष्ट करतांना इंडीयन स्टुडंट्स कौन्सिलच्या कार्याचा आढावा घेतला. मान्यवर डॉ. गो. बं.देगलूरकर यांचा परिचय डॉ. सिमा शेटे यांनी तर डॉ. प्रभाकर देव सर यांचा परिचय प्रा. सोनाली लांजेवार यांनी करून दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीमाला के.जी.यांनी तर आभार सीमा घोलप यांनी मांडले.  गुगल मीट या आभासी तंत्रज्ञानाद्वारे घेण्यात आलेल्या या एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात मोठ्या प्रमाणात इतिहास प्रेमी, अभ्यासक व नव संशोधकांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. विलास वाहणे, डॉ. ज्ञानोबा कदम, हेमंत गोसावी, समन्वयक डॉ. माधवी महाके व इंडियन स्टुडंट कौन्सिलच्या सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR