लातूर : प्रतिनिधी
नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. या सणाला गोडधोड म्हणजेच तीळगूळ देण्याची व खाण्याची परंपरा असून तीळगूळ घ्या आणि गोड बोला म्हणत परस्परातील स्नेह वृद्धिंगत करण्याचा सण अवघ्या एक दिवसावर येवून ठेपला आहे. त्यामुळे शहरातील बाजारात महिला वर्गाने मकर संक्रातीची खरेदी करण्यासाठी एकच गर्दी केली असल्याचे दिसून आले. मात्र गतवर्षाच्या तूलनेत यंदा मकर संक्रातीचा गोडवा जवळपास ५ ते १० टक्के महागला असल्याचे व्यापा-यांनी सागीतले.
मकर संक्रात येताच सर्वाधिक मागणी असते ते तीळ, गूळ आणि साखर, लाडू यासह आदी पधार्थाना विषेश मागणी असते. मकर संक्रातीच्या दिवसी यांचे एकत्रित मिश्रण करून त्याचे सर्वांना वाटप केले जाते. याकरिता गृहिणींची मोठया प्रमाणात धडपड सुरू असते. गतवर्षाप्रमाणे यावर्षीदेखील बाजारपेठेत तीळगुळाचे साहित्य खरेदी करण्यासाठी मागील आठ ते दहा दिवसापासून महिला वर्गाची लगबग सुरू झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा तीळ, गुळ या दोन्ही वस्तूंचे भाव वाढल्याने संक्रांतीचा गोडवा महागला आहे.
मकर संक्रांत हा भारतातील पौष महिन्यात येणारा सण सर्वत्र परिवर्तन, उत्साह आणि आनंदाची पेरणी करुन जातो. सौर कालगणनेशी संबंधित या भारतीय सणात तीळगुळाचे महत्त्व मोठे आहे. या दिवसांमध्ये शेतात आणि मळयामध्ये आलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकांना देतात. हरभरा, ऊस, बोर, गव्हाची ओंबी, तीळ अशा गोष्टी सुगड्यात भरुन त्या देवाला अर्पण करण्यात येतात. घरोघरी वाणासोबतच तीळगूळ देण्याची प्रथा आहे. उत्तरायणापासून दिवस तीळ तीळ वाढतो म्हणजेच ऊन वाढत जाते, अशीदेखील आख्यायिका आहे. असा हा गोडवा देणारा सण यंदा महाग झाला आहे. तीळ आणि गुळाचे भाव यंदा वाढले आहेत. गेल्यावर्षी तिळाचा भाव १६० रुपये प्रतिकिलो होता तर यंदा १८५ रुपये किलोपर्यंत गेला आहे.
गुळाचा भाव हा ४५ ते ५० रुपये किलो होता. यंदा गुळाचा भाव ६० ते ७० रुपये प्रतिकिलो आणि साखर ४० ते ५० रुपये भाव आहे. गतवर्षाच्या तुलनेत यंदा ५ ते १० टक्क्यांची वाढ झाली असल्याचे व्यापा-यांनी सागीतले.
शहरातील बाजारपेठेत तीळ १३५ ते १८५ रुपये किलोने विकले जात आहेत, तर गुळासाठी ६० ते ७० रुपये मोजावे लागत आहेत. याशिवाय शेंगदाणे ९० ते १२० रुपये किलोने विकले जात आहेत. तीळाची रेवडी ४० ते ५० रूपये पावकिलो प्रमाणे विक्री केली जात आहे. तिळापासून तयार केलेले लाडू, रेवड्या, चिक्की, हलवा इत्यादी पदार्थ ४० ते ६० रुपये पाव किलोपासून बाजारात विकले जात आहेत.
त्याचबरोबर तीळाच्या रेवडीचे दर काहि प्रमाणात कमि असल्याने त्याला विषेश मागणी असल्याचे अजीन पठ्ठान यांनी सागीतले. त्याशिवाय काळया तिळाचे लाडूदेखील बाजारात विक्रीस उपलब्ध आहेत. सोबतच बाजारात तूप, गूळ, शेंगदाणे आणि विविध सुकामेवा वापरून बनवलेल्या गजक लादेखील विशेष मागणी असून, १६० ते ३५० रुपये पाव किलोपासून बाजारात विकले जात आहे. हळदी कुंकवाचे वाण खरेदीसाठी विविध आकर्षक वस्तू खरेदीकरण्यासाठी शहरातील बाजारपेठेत महिला ग्राहकांची वर्दळ वाढली आहे. त्यातबरोबर चमचे, वाटी, सोप, केस, डब्बे, कुंकवाचा कंरडा यांसह रोजच्या वापरात येणा-या वस्तूं खरेदीवर महिला वर्गाने भर दिला आहे. तर अलीकडच्या काही वर्षापासून झाडांची छोटी रोप वाण म्हणून देण्याचे प्रमाणही गेल्या काहि वर्षापासून वाढले आहे. सुवासिनींचा मकरसंक्रात हा महत्त्वाचा सण असल्याने या दिवशी वाणाला अधिक महत्त्व आहे. त्यामुळे वाण घेण्यासाठी व तिळगुळ वाटण्यासाठी खणाची (सुगडी) आवश्यकता असल्याने खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे. त्याचबरोबर संक्रांतीला विशेष मान असणा-या हलव्याच्या दागन्यिांमध्ये मुकुट, बाजूबंद, अंगठी, झुमके वेल, झुमके आदी दागिन्यासह विविध वस्तू बाजारत उपलब्ध असल्याचे व्यापा-यांनी सागीतले.