राज्याचे मत्स्योद्योग आणि बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी मटण दुकानांना ‘मल्हार प्रमाणपत्र’ देण्याचा निर्धार केला आहे. ‘मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉम’च्या माध्यमातून फक्त हिंदू समाजातील खाटिकांना हे प्रमाणपत्र मिळणार आहे. ‘मल्हार सर्टिफिकेशन’ नसेल तिथे मांस खरेदी करू नका, असे आवाहनही नितेश राणे यांनी केले आहे त्यामुळे नवा वाद उफाळून आला आहे. मल्हार सर्टिफिकेशनच्या माध्यमातून आपल्याला आपल्या हक्काची मटण दुकाने उपलब्ध होतील, विकणारा व्यक्तीदेखील हिंदू असेल. कुठेही मटणामध्ये भेसळ झालेली आढळणार नाही.
मल्हार सर्टिफिकेशनचा वापर जास्तीत जास्त करावा, जिथे मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिथे मटण खरेदी करू नये, असे आवाहन नितेश राणे यांनी केले. हिंदू समाजासाठी अतिशय महत्त्वाचे पाऊल आम्ही उचललेले आहे, असेही ते म्हणाले. महाराष्ट्र हा सामाजिक सलोख्याचा आदर्श मानला जातो मात्र गत काही दिवसांतील घडामोडी पाहता हा सलोखा या पुढेही कायम राहील का? असा प्रश्न पडतो. राज्याचे मंत्री नितेश राणे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळातील एक जबाबदार कॅबिनेट मंत्री असल्याने त्यांनी जाहीर केलेली योजना आणि घोषणा हा राज्य सरकारचा निर्णय आहे, असे गृहीत धरले जाते. नितेश राणे हे अनेक कारणांनी कायम चर्चेत असतात. आता त्यांनी मटण दुकानदारांना मल्हार प्रमाणपत्र देण्याच्या धोरणाला पाठिंबा जाहीर करत हलाल विरुध्द झटका वाद पेटवून दिला आहे. जनतेने हिंदू समाजातील दुकानदारांकडूनच मटण विकत घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
या प्रमाणपत्राबाबत अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. धर्मनिरपेक्ष देशात अमूक एका धर्मियांकडूनच खरेदी करा, असे आवाहन आणि तेही एका मंत्र्यांकडून केले जाणे हे कोणत्या चौकटीत बसते ते जनतेला समजले पाहिजे. एकीकडे राजर्षि शाहू, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा हा महाराष्ट्र आहे, असे म्हणायचे आणि दुसरीकडे धर्माधर्मांत फूट पडेल, असे निर्णय जाहीर करायचे. हे इंग्रजांच्या झोडा, फोडा आणि राज्य करा या धोरणासारखेच आहे. पुरोगामी महाराष्ट्र आपण किती मागे घेऊन चाललो आहोत याचा विचार मंत्री करत नसतील तरी सरकारला हे मान्य आहे का? याचा उलगडा झाला पाहिजे. सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांनी हे सरकारचे नव्हे तर एका संघटनेचे मत आहे, अशी भूमिका घेतली आहे; परंतु सर्वसाधारणपणे मंत्रिपदावरील नेत्यांनी केलेले वक्तव्य सरकारच्या वतीने करण्यात आल्याचे मानले जाते. मंत्रिमहोदय केवळ मल्हार प्रमाणपत्राबाबत वक्तव्य करून थांबले नाहीत तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराच्या धोरणाबाबतही काही वादळी वक्तव्ये केली आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात कोणीही मुस्लिम सरदार नव्हते.
स्वराज्याची लढाई ही इस्लामच्या विरोधातच होती, असे उद्गार निलेश राणे यांनी काढले आहेत. महाराष्ट्रासाठी हा एक ऐतिहासिक धक्काच आहे. अनेक थोर इतिहास संशोधकांनी केलेल्या संशोधनाच्या आधारे शाळेत शिकविला जाणारा इतिहास असा कधीच नव्हता. छत्रपती शिवाजी महाराजांना आग्य्राहून सुटका करून घेताना त्यांना मदत करणा-यांमध्ये मदारी मेहतर होता. त्यांच्या आरमारात दौलत खान हा महत्त्वाचा सरदार होता. सिद्दी हिलाल हा त्यांचा विश्वासू सहकारी होता. हाच इतिहास शालेय शिक्षणातून शिकत अनेक पिढ्या मोठ्या झाल्या आणि आता नितेश राणे तो चुकीचा ठरवत आहेत. हिंदवी स्वराज्य म्हणजे हिंदू आणि मुस्लिम यांची लढाई होती, असा शोध नितेश राणे यांनी लावला आहे. वास्तविक पाहता हिंदू स्वराज्याची परिभाषा अशी की, हिंदवी म्हणजे हिंदुस्थानात राहणारे. मग ते कोणत्याही धर्माचे वा जातीचे असोत त्यांचे राज्य ते हिंदवी स्वराज्य, असे शालेय पुस्तकात नमूद आहे. आपल्या मुस्लिम सैनिकांसाठी शिवाजी महाराजांनी मस्जिदी उभारल्या होत्या.
त्यांचा लढा हा मुघलांकडून होणा-या अन्याय-अत्याचाराविरोधात होता, असे इतिहास संशोधक सांगतात. आता नितेश राणे जे काही सांगत आहेत त्याच्याशी हे सारे विसंगत आहे. पाठ्यपुस्तकात एक आणि नेत्यांच्या ओठी भलतेच, असे चित्र आहे. यातून कोणाची नाचक्की होत असेल तर ती सरकारचीच! कोणत्याही संशोधनाच्या आधाराशिवाय नेत्यांनी, असे जाहीररित्या बोलणे म्हणजे चुकीच्या इतिहासाची पाठराखण करण्यासारखी आहे. असाच इतिहास पुढे सत्य असल्याचे गृहीत धरले जाण्याचाही धोका आहे त्यामुळे जनतेच्या मनात निर्माण झालेला संभ्रम दूर करण्याचे काम सरकारला करावे लागणार आहे. आता सरकारने नितेश राणे यांच्या वक्तव्याशी सरकारचा काही एक संबंध नाही, असे जाहीर करावे अथवा त्यांनी मांडलेला इतिहास योग्य आहे, असे साधार स्पष्ट करत शालेय शिक्षणात समाविष्ट असलेला इतिहास बदलण्याचे काम करावे. मंत्री हे मुख्यमंत्र्यांना डोईजड होत आहेत, असा संदेश जाणे योग्य नाही. राज्यातील वातावरण बिघडवण्याचे काम किमान सरकारने तरी करू नये. गत काही दिवसांत जे काही बोलले जात आहे, निर्णय घेतले जात आहेत ते धार्मिक विखार पसरविणारे आहेत.
यामुळे समाजात निर्माण होणारी तेढ, रुंदावत जाणारी दरी राजकारण्यांच्या दृष्टीने पथ्यावर पडणारी असली तरी त्याचे दीर्घकालीन परिणाम समाजासाठी विषारीच ठरतील. मंत्री नितेश राणे यांच्या भूमिकेचा अनेकांनी विरोध केला आहे. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही असहमती दर्शविताना म्हटले आहे की, मटण झटका असो वा हलाल आपल्याला खायला मिळाले पाहिजे. एवढी टोकाची भूमिका घेऊ नका, असा सल्लाही त्यांनी नितेश राणे यांना दिला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम सैन्य नव्हते, असे म्हणणे चुकीचे आहे. इतिहासात शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचे प्रमुख मुस्लिम होते, असे पुरावे आहेत. अनेक शूर मुस्लिम हे मुघलांच्या विरोधात लढले आहेत हा इतिहास आहे. इतिहासासंबंधी राणे जे बोलतात ते चुकीचे आहे. त्या वेळी नितेश राणे नव्हते आणि मीही नव्हतो, असे रामदास आठवले म्हणाले.