नवी दिल्ली : नामनिर्देशन प्रक्रियेतील कथित अनियमिततेच्या कारणावरून पंजाबमध्ये सुरू असलेल्या पंचायत निवडणुकांना स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज नकार दिला आणि म्हटले की, जर न्यायालयांनी मतदानाच्या दिवशी निवडणुकांना स्थगिती दिली तर त्यामुळे अराजक होईल. पंजाबमधील पंचायत निवडणुकीसाठी मंगळवारी सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात झाली आणि सध्या सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी करणा-या याचिका सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर मांडण्यात आल्या.
खंडपीठाने सांगितले की, आज मतदान सुरू झाले असेल तर या टप्प्यावर आम्ही हस्तक्षेप कसा करू शकतो? कदाचित उच्च न्यायालयाने याचे गांभीर्य समजून निवडणुकीवरील स्थगिती उठवली असेल.
न्यायमूर्ती जेबी परडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांचाही या खंडपीठात समावेश होता. सरन्यायाधीश म्हणाले, आम्ही मतदानावर बंदी घातली, तर तीही मतदानाच्या दिवशी, अराजकता येईल. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण-या याचिकांवर सुनावणी घेण्याचे मान्य केले. सुरुवातीला एका वकिलाने सांगितले की पंजाबमध्ये आज पंचायत निवडणुकीसाठी मतदान सुरू झाले आहे आणि उच्च न्यायालयाने सुमारे १,००० याचिका पूर्ण सुनावणीशिवाय निकाली काढल्या आहेत.