मुंबई : प्रतिनिधी
मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी सकाळी ७.३० पासून मतदानाला सुरुवात झाली. आज अनेक सेलिब्रिटीज मतदानासाठी बाहेर पडले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आज सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. सचिन तेंडुलकर सकाळीच मतदानासाठी उपस्थित होता. मतदानानंतर सचिन म्हणाला की, क्रिकेटमध्ये जसे धावांना महत्त्व आहे, तसेच लोकशाहीत प्रत्येक थेंबासारखे तुमच्या मताचे महत्त्व आहे, असे सांगत सचिन तेंडुलकरने मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले.
सचिन तेंडुलकरने सकाळीच वांद्रे येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. त्याच्यासोबत त्याची पत्नी अंजली तेंडुलकर देखील होती. मतदानानंतर सचिन म्हणाला की, लोकशाहीने आपल्याला संधी दिली आहे, की जिथे आपण आपले मत मांडू शकतो. आपल्या शहराचा जो निकाल आपल्याला अपेक्षित आहे, त्यासाठी घरातून बाहेर पडावे लागेल. मतदान करावे लागेल. घरात बसून चालणार नाही. तर मतदान केंद्रावर येऊन बटण दाबावे लागेल, असे आवाहन त्याने त्याच्या चाहत्यांना आणि एकूणच मतदारांना केले.
सचिन तेंडुलकर म्हणाला की, मी मतदान करायला आलो कारण मला असं वाटतं की प्रत्येकाच्या मताने फरक पडतो. त्यामुळेच मी मतदान करत आहे. सर्वांना विनंती करतो की या आणि मतदान करा. कारण आपलं जे मत आहे, ते मांडण्याची ही एक संधी आहे. येथे येऊन मत मांडा, हीच ती वेळ आहे.
मताधिकाराचा नीट वापर करा. ही अशी संधी असते जिथे तुम्हाला तुमचे मत मांडता येते. तुमचे मत तुम्ही मतदानातून सांगू शकता. तुम्हाला जो निकाल अपेक्षित असतो त्यासाठी मतदान करणं गरजेचं असतं, असेही सचिन तेंडुलकर म्हणाला.

