लातूर : प्रतिनिधी
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघातील २ हजार १४२ मतदान केंद्रांसह एका सहाय्यकारी मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. याकरिता प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान केंद्र संख्येच्या २० टक्के राखीव मतदान यंत्रांसह, तसेच ३० टक्के राखीव व्हीव्हीपॅटसह वितरण करण्यात येणार आहे. यासाठी मतदान यंत्रांचे (बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट) आणि व्हीव्हीपॅटचे पहिले सरमिसळीकरण (रँडमायझेशन) जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या उपस्थितीत पार पडले.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम, मतदानयंत्र व्यवस्थापन कक्षाच्या नोडल अधिकारी अहिल्या गाठाळ, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियांका आयरे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी प्रदीप डूमणे, निवडणूक नायब तहसीलदार पंकज मांदाडे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
पहिल्या सरमिसळीकरणानंतर लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील ३६३ मतदान केंद्रांसाठी ४३५ बॅलेट युनिट व कंट्रोल युनिट आणि ४७१ व्हीव्हीपॅट संच, लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील ३८८ मतदान केंद्रांसह एका सहाय्यकारी मतदान केंद्रासाठी ४६६ बॅलेट युनिट व कंट्रोल युनिट आणि ५०५ व्हीव्हीपॅट संच, अहमदपूर विधानसभा मतदारसंघातील ३७६ मतदान केंद्रासाठी ४५१ बॅलेट युनिट व कंट्रोल युनिट आणि ४८८ व्हीव्हीपॅट संच, उदगीर (अ. जा.) विधानसभा मतदारसंघातील ३५९ मतदान केंद्रासाठी ४३० बॅलेट युनिट व कंट्रोल युनिट आणि ४६६ व्हीव्हीपॅट संच, निलंगा विधानसभा मतदारसंघातील ३४७ मतदान केंद्रासाठी ४१६ बॅलेट युनिट व कंट्रोल युनिट आणि ४५१ व्हीव्हीपॅट संच, औसा विधानसभा मतदारसंघातील ३०९ मतदान केंद्रासाठी ३७० बॅलेट युनिट व कंट्रोल युनिट आणि ४०१ व्हीव्हीपॅट संच वितरीत करण्यात येणार
आहेत.
मतदान यंत्रांचे (बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट) आणि व्हीव्हीपॅटच्या पहिल्या सरमिसळीकरणामध्ये या यंत्रांचे विधानसभा मतदारसंघनिहाय वितरण करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हास्तरावरुन मतदान यंत्रे संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सुपूर्द केली जाणार आहेत. यानंतर दुस-या सरमिसळीकरणानंतर या यंत्राचे मतदान केंद्रनिहाय वितरण होईल.