29.9 C
Latur
Monday, May 19, 2025
Homeअंतरराष्ट्रीयमदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी

मदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी

इस्लामाबाद : वृत्तसंस्था
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) मदत कार्यक्रमाच्या अंतर्गत निधीचा पुढील हप्ता जारी करण्यासाठी पाकिस्तानवर ११ नवीन अटी लादल्या आहेत. अटी लादताना ‘आयएमएफ’ने पाकिस्तानला इशारा दिला आहे की, भारतासोबतच्या तणावामुळे या मदत योजनेची वित्तीय आणि सुधारणा संबंधित उद्दिष्टे पूर्ण होण्याच्या मार्गातील धोके वाढू शकतात. रविवारी विविध माध्यमांनी याबाबत माहिती दिली आहे.

पाकिस्तानवर नवीन अटींमध्ये मुख्यत: १७,६०० अब्ज रुपयांच्या नवीन अर्थसंकल्पाला संसदेची मंजुरी मिळविणे, वीजबिलांवरील कर्जफेड अधिभारामध्ये वाढ आणि तीन वर्षांहून अधिक जुन्या गाड्यांच्या आयातीवरील बंदी उठविणे, यांचा समावेश आहे. ‘एक्स्प्रेस ट्रिब्यून’ वृत्तपत्राच्या अहवालात म्हटले आहे की, ‘आयएमएफ’ने भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे या कार्यक्रमापुढे अनेक आव्हाने निर्माण होतील.

संरक्षणासाठी वाढीव निधी
‘आयएमएफ’च्या अहवालात पुढील आर्थिक वर्षासाठीचा संरक्षण अर्थसंकल्प २,४१४ अब्ज रुपये इतका दर्शविला आहे. हा अर्थसंकल्प २५२ अब्ज रुपयांनी (१२ टक्के) अधिक आहे.

आयएमएफच्या अंदाजाशी तुलना करता, सरकारने या महिन्याच्या सुरुवातीला भारतासोबत वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण क्षेत्रासाठी अधिकचे २,५०० अब्ज रुपये (१८ टक्के) देण्याचे संकेत दिले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR