सोलापूर-विदेशी मद्य विक्रीकर व एक्साईज ड्युटीमध्ये ६० ते ७० टक्के वाढ झाल्या कारणाने विदेशी मद्यांचे भावात वाढ झालेले आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या खिशावर परिणाम होणार व बेकायदेशीर दारूच्या विक्रीमध्ये भरमसाठ वाढ होणार असल्याने सोलापूर जिल्हा परमिट रूम आज दिवसभर बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती असोसिएशन अध्यक्ष संजीव इंदापूरे यांनी दिली.
यासाठी जिल्ह्यातील परमीट रूम धारकांच्या बैठकीचे त्यांनी आज आयोजन केले होते. दिलेल्या पत्रकात त्यांनी पुढे म्हटले आहे की, विदेशी मद्य दरवाढ झाल्यामुळे प्रत्येक परमिट रूम बारच्या व्यवसायावर परिणाम होऊन विक्रिमध्ये मोठी घट होऊन, बेकायदेशीर दारू विक्रित वाढ होणार आणि स्वस्त दारू वाईनशॉपमध्ये खरेदी करून रस्त्यावर दारूचे सेवन करणाऱ्यांमुळे सामान्य नागरिकांना त्याचा त्रास भोगावा लागेल व तसेच परमिट रूमच्या विक्रीवर अगोदर व्हॅट ५% होता आता ते १० टक्के झाला असल्याकारणाने देखील भाव वाढ झालेली आहे.
परमिट रूममध्ये दारूचे भाव वाढल्याकारणाने गावातील ढाबे आणि इतर खानावळीत बेकायदेशीर दारू विक्री होऊन शासनाचा कर बुडण्याचे प्रमाण वाढण्याची भीती या बैठकीत त्यांनी व्यक्त केली आहे. यामुळे मद्य विक्रीकर व एक्साईज ड्यूटीम ध्ये झालेली वाढ कमी करण्यासाठी शासनाचे लक्ष वेधण्याकरिता सोलापूर जिल्ह्यातील सर्व परमिट रूम धारकांनी दि. १४ जुलै २०२५ रोजी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. या बैठकीला अजय काळे, हरिभाऊ चौगुले, संजीव इंदापुरे, उमाकांत साळुंके, आकाश हाके, पुनित बचुवार, सागर कुरापाटी, निलेश धोत्रे, अमर पाटील, सीताराम शिखरे, धुळोबा नरोटे आदींची उपस्थिती होती. आजच्या बंदमुळे सोमवारी जिल्ह्यासह राज्यातील परमिट रूम आणि बार पूर्णपणे बंद राहणार आहेत, यामुळे राज्याच्या महसुलावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
सरकारने काही दिवसांपूर्वी दारूवरील व्हॅट दुप्पट केला आहे. त्यामुळे हॉटेल आणि बार उद्योगावरील आर्थिक भार वाढला आहे. त्याचबरोबर परवाना शुल्कात १५% आणि उत्पादन शुल्कात ६० % वाढ करण्यात आली असल्याने व्यापाऱ्यांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे बंदची घोषणा करण्यात आली आहे.असे अध्यक्ष संजीव इंदापुरे यांनी सांगीतले.