नंदुरबार : प्रतिनिधी
नंदुरबारमध्ये आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांवर मधमाशांनी अचानक हल्ला केल्यामुळे एकच खळबळ उडाली. शाळेतील मैदानात विद्यार्थी खेळत होते, त्याचवेळी मधमाशांच्या थव्याने हल्ला केला. मधमाशाने हल्ला केल्यामुळे एकच खळबळ उडाली, विद्यार्थी सैरावैरा धावू लागले. जखमी विद्यार्थ्यांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
मधमाशा चावल्यानंतर काही जणांना उलट्याचा त्रास होत होता. नवापूर तालुक्यातील बंधारे येथे आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत शासकिय आश्रम शाळेत मधमाशाचा हल्ला केल्याची घटना घडली. विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
नवापूर तालुक्यातील बंधारे येथे आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत शासकिय आश्रमशाळा आहे. या आश्रमशाळेत इयत्ता दुसरी ते सहावीच्या वर्गात शिकणारे विद्यार्थी हे शाळेच्या मागील बाजूच्या परिसरात खेळत होते. या शाळेच्या खिडकीला मधमाश्यांचे पोळे लागलेले होते. परंतू अचानक त्या पोळ्यावरील मधमाश्यांनी उडून परिसरात खेळत असलेल्या विद्यार्थ्यांवर हल्ला करीत चावा घेतला. यामुळे विद्यार्थी आरडाओरड करु लागल्याने आश्रमशाळेच्या अधिक्षकांसह शिक्षकांनी धाव घेतली.
मधमाश्यांनी चावा घेतल्याने १३ विद्यार्थी जखमी झाल्याचे दिसून आले. यावेळी रिक्षात टाकून विद्यार्थ्यांना उपचारासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील ३ विद्यार्थ्यांना उलटी व मळमळीचा त्रास होत असल्याने पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच १० विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.