लातूर : प्रतिनिधी
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व लातूर शहर महानगरपालिका लातूर यांच्या वतीने दि. २२ मार्च रोजी राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात आली होती. या लोकअदालतीस प्रचंड प्रतिसाद मिळाला. एकाच दिवशी १५०० थकबाकीदार मालमत्ता धारकांनी ५ कोटी रुपयांचा कर भरला.
लातूर शहर महानगरपालिकेच्या मुख्यालयात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव केसतीकर व मनपा आयुक्त तथा प्रशासक बाबासाहेब मनोहरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही राष्ट्रीय लोकअदालत नियोजन करण्यात आली होती. सदरील लोकअदालात येथे पॅनल प्रमुख म्हणून निवृत्त जिल्हा न्यायाधीश पी. एम. शिंदे व वकील प्रतिनिधी म्हणून वाघमारे यांनी काम पाहिले. या लोकअदालतीत एकूण २६१ प्रकरणात तडजोड करण्यात आली.
लातूर शहर महानगरपालिका हद्दीतील मालमत्ता धारकाकडून सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात १०० टक्के कर वसुली करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक बाबासाहेब मनोहरे यांनी कर संकलन विभागास दिले होते. त्यादृष्टीने उपायुक्त डॉ. पंजाब खानसोळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर संकलन विभाग वर्षाच्या सुरुवातीपासूनच टॅक्स वसुलीच्या दृष्टीने विविध उपक्रम, योजना राबवित आहे. त्यानुसार मालमत्ता धारकाना विविध सूट, सवलती देण्यात आले होते. सोबतच थकबाकीदार मालमत्ता धारक यांच्याकडील थकीत कराची रक्कम पाहता ही प्रकरणे राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला व त्याकरिता १०० टक्के शास्ती माफी सुद्धा लागू करण्यात आली होती.
तसेच सदर योजना एक दिवसासाठी संपूर्ण मालमत्ता धारकासाठी लागू करण्यात आली होती. त्यामध्ये लोकअदालत सोबतच शहरातील इतर थकबाकीदार असे मिळून तब्बल १५०० थकबाकीदार मालमत्ता धारकाकडून एकाच दिवसात ५ कोटीचा कर संकलन करण्यात कर विभाग यशस्वी झाला आहे. १०० टक्के शास्ती माफी योजना व लोक अदालतमध्ये अधिकाधिक नागरीकाना सहभागी होता यावे या दृष्टीने कर अधीक्षक, क्षेत्रीय अधिकारी निर्मला माने, संतोष लाडलापुरे, बंडू किसवे, समाधान सूर्यवंशी यांच्यासह सर्व कर पर्यवेक्षक व वसुली लिपिक यांनी अथक परिश्रम घेतले.