लातूर : प्रतिनिधी
अनधिकृत होर्डिंग व बॅनर विरोधात आयुक्त तथा प्रशासक बाबासाहेब मनोहरे यांच्या निर्देशानुसार रविवारी (दि. ९) मोहीम राबवण्यात आली. यात ६०० अनधिकृत होर्डिंग व बॅनर काढत दोघाजणांच्या विरोधात ३ गुन्हे दाखल करण्यात आले. तर उपायुक्त डॉ. पंजाबराव खानसोळे यांनी पहाटेच रस्त्यावर उतरत या मोहिमेचे नेतृत्व केले.
मा. उच्च न्यायालयाने अनधिकृत पोस्टर्स, बॅनर्स होर्डिंग व कमानीबाबत संदर्भीय पीआयएल न. १५५/२०११ नुसार आदेश दिलेले आहेत. दि. ३१ जानेवारी २०१७ नुसार महाराष्ट्र मालमत्ता वीरूपन प्रतिबंध कायदा १९९५ व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ अंतर्गत तरतुदीनुसार कार्यवाही करणेस्तव पालिकेकडून अधिका-यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी शहरातील अधिकृत होर्डिंग बॅनर व कमानी काढण्यासंदर्भात आदेश दिलेले आहेत. त्यानुसार उपायुक्त डॉ. पंजाबराव खानसोळे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी सकाळी ६ वाजताच रस्त्यावर उतरले. या मोहिमेत शहरातील ६०० हून अधिक अनधिकृत होर्डिंग व बॅनर हटवण्यात आले.
शहरात होर्डिंग व बॅनर लावण्यासाठी परवानगी घ्यावी, असे मनपाने सुचित केलेले आहे. कसलीही परवानगी न घेता हे बॅनर लावण्यात आले होते. त्यामुळे त्यामुळे हे बॅनर काढून टाकण्यात आले. यापुढे अशा पद्धतीने बॅनर लावू नयेत अन्यथा दंडात्मक व कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही मनपाच्या वतीने देण्यात आला आहे.