26.6 C
Latur
Sunday, March 16, 2025
Homeमहाराष्ट्रमनसेच्या तालुकास्तरीय बैठकीत राडा

मनसेच्या तालुकास्तरीय बैठकीत राडा

पदाधिकारी-जिल्हा सचिव यांच्यात तुंबळ हाणामारी

कर्जत : प्रतिनिधी
तालुकास्तरीय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांची बैठक जिल्हा अध्यक्ष यांच्या आदेशाने बोलावण्यात आली होती. जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या अनुपस्थितीत झालेल्या बैठकीत पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि पदाधिकारी आणि पक्षाचे जिल्हा सचिव यांच्यात प्रथम शाब्दिक आणि नंतर तुंबळ हाणामारी झाली. त्यात विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष सतीश कालेकर यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली. याप्रकरणी नेरळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून जिल्हा सचिव अक्षय महाले आणि पारस खैरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ९ मार्च या पक्षाच्या वर्धापनदिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्ष संघटना व शिस्तीबाबत धडे दिले होते. राज ठाकरे यांनी केलेल्या सूचनेनुसार कर्जत तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आगामी काळातील पक्षाची शिस्तबध्द संघटनात्मक बांधणी तसेच रिक्त जागेच्या नियुक्तीबाबत निर्णय आपापल्या विभागानुसार पक्षाचे उपक्रम, संघटनात्मक उपक्रमात जनतेचा सहभाग याबाबत मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी नेरळ येथे आयोजित करण्यात आली होती.

जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या आई आजारी असल्याने त्यांना घेऊन नवी मुंबई येथे रुग्णालयात जावे लागल्याने जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या अनुपस्थितीत ही बैठक झाली. या बैठकीला तालुका अध्यक्ष यशवंत भवारे यांच्यासह पक्षाचे तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत पक्षाचे अनेक वर्षे निष्ठावंत कार्यकर्ते असलेले आणि पक्ष पदाधिकारी सतीश कालेकर यांनी विधानसभा निवडणुकीतील रणनीती आणि नंतरची वाटचाल यविषयी चर्चा सुरू केली. चर्चा वादळी रूप धारण करीत असताना मनसेचे जिल्हा सचिव अक्षय महाले व सतीश कालेकर यांच्यामध्ये पक्षाच्या बॅनरच्या फोटोवरून आपापसांत शाब्दिक चर्चा होऊ लागली. त्यानंतर या चर्चेचा राग आल्याने मनसेचे जिल्हा सचिव अक्षय महाले आणि त्यांच्या सोबत उपस्थित असलेले तेजस खैरे यांच्याकडून सतीश कालेकर यांना हाणामारी सुरू झाली. त्यावेळी बैठकीसाठी लावण्यात आलेल्या खुर्च्या फेकून मारण्यास सुरुवात झाली,त्यात सतीश कालेकर यांच्या डोक्यातून रक्त वाहू लागले आणि शेवटी हे भांडण नेरळ पोलिस ठाण्यात पोहोचले.

नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार केल्यानंतर सतीश कालेकर यांना झालेली मारहाण याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पक्षाची बाजू चव्हाट्यावर येऊ नये म्हणून हे प्रकरण मिटवण्याचा देखील प्रयत्न मनसेच्या वरिष्ठ पातळीवरून सुरू होता, मात्र कधीही अपक्षांच्या बैठकीत न आलेल्या पारस खैरे याला आपल्यासोबत भांडण करण्यास आणण्यात आले होते आणि हे सर्व जाणीवपूर्वक ठरवून केले असल्याचा आरोप सतीश कालेकर यांचा होता.

नेरळ पोलिस ठाण्यात सतीश वाळकू कालेकर राहणार बिरडोळे यांच्याकडून दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीनुसार त्यांना झालेल्या मारहाण प्रकरणी भारतीय दंड संहिता कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२),३(५)प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अक्षय नानाभाऊ महाले आणि पारस खैरे (दोघे रा. डायमंड सोसायटी, डिकसळ गारपोली) यांच्यावर हा गुन्हा दाखल आहे. प्रभारी पोलिस अधिकारी शिवाजी धावले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार लावरे अधिक तपास करीत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR