मुंबई : गुढीपाडवा मेळाव्याच्या निमित्ताने शिवाजी पार्कमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मेळाव्याची जोरदार तयारी सुरू असतानाच मनसेच्या एका पोस्टरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मनसेच्या गुढीपाडावा मेळाव्याच्या पोस्टरवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो झळकला आहे. बाळासाहेबांबरोबरच प्रबोधनकार ठाकरेंसहित राज ठाकरे आणि अमित ठाकरेंचाही फोटो या पोस्टरवर आहे. मनसेच्या पोस्टरवर अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच बाळासाहेबांचा फोटो झळकल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
शिवसेनेतून राज ठाकरे बाहेर पडल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी, ‘माझा फोटो वापरायचा नाही’, असे सांगितल्यानंतर आतापर्यंत मनसेने बाळासाहेबांचा फोटो वापरला नव्हता. मात्र आता मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्याच्या निमित्ताने शिवाजी पार्कमध्ये लागलेल्या पोस्टरवर बाळासाहेब ठाकरे, प्रबोधनकार यांचे फोटो लावण्यात आले आहेत.
बाळासाहेब ठाकरे यांचे नाव थोर व्यक्तींच्या यादीत राज्य सरकारने समाविष्ट केले आहे. त्यामुळे त्यांचा फोटो कुणालाही वापरता येऊ शकतो, असा युक्तिवाद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नुकताच केला होता. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली पक्षात फूट पडल्यापासून सातत्याने बाळासाहेबांचा फोटो वापरत आले आहेत. एकनाथ शिंदेंसहित त्यांचा पक्ष बाळासाहेबांचा फोटो वापरतो. बाळासाहेबांचा फोटो वापरणा-या पक्षांमध्ये आता मनसेचीही भर पडली आहे. त्यामुळे आता तीन पक्ष बाळासाहेबांचे फोटो वापरू लागले आहेत.
उद्धव ठाकरेंची खोचक प्रतिक्रिया
उद्धव ठाकरेंना पत्रकार परिषदेमध्ये मनसेने बाळासाहेबांचा फोटो वापरल्यासंदर्भात विचारण्यात आले. यावर उद्धव ठाकरेंनी, आता सगळ्यांना कळतंय की बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाशिवाय पर्याय नाही. आता सगळेच पक्ष बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वापरत आहेत. त्यांना कळले आहे की याशिवाय आता पर्याय नाही, अशी प्रतिक्रिया नोंदवली.
मनसे बॅनर्स काढणार
दरम्यान, मनसेचे पदाधिकारी यशवंत किल्लेदार यांनी या बॅनरवरून स्पष्टीकरण दिले आहे. ज्याने बॅनर लावले तो पक्षाचा सुरुवातीपासूनच कार्यकर्ता आहे. भावनेच्या भरात त्याने हे बॅनर्स लावले. बॅनर्स काढण्यात येतील, असे किल्लेदार यांनी म्हटले आहे.