मुंबई : प्रतिनिधी
मनसेप्रमुखांचे निवासस्थान हे सध्या राजकीय ‘कॅफे’
बनले आहे आणि भाजपाचे मंत्री आशिष शेलार यांच्यासह आमदार प्रसाद लाड वगैरे अतिज्येष्ठ नेत्यांना त्या कॅफेत राखीव जागा आहेत, पण मुख्यमंत्री जातात आणि ‘न्याहरी’साठी गेल्याचे सांगतात, तेव्हा त्या कॅफेचे महत्त्व वाढते, अशी बोचरी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
दरम्यान,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवाजी पार्कात छुपा मित्रपक्ष असलेल्या राज ठाकरे यांच्या भेटीस गेले. त्या भेटीबद्दलही तर्क-वितर्क आणि कुतर्क लढवून बातम्यांचे फुगे हवेत सोडले गेले. ‘फडणवीस-राज’ यांची काय ही पहिलीच भेट नव्हती. भाजपाचे इतरही नेते राज ठाकरे यांच्या घरी नियमित चहापानासाठी जात-येत असतात.
खरं म्हणजे, मुख्यमंत्री फडणवीस गेले यात नवल ते काय? भाजपा आणि राज ठाकरे यांच्या ‘मनसे’ पक्षाची ‘तन-मन-धना’ची युतीच आहे. त्यामुळे युतीतील पक्षांशी संवाद ठेवण्यासाठी मुख्यमंत्री तेथे गेले असतील. शिवसेना-भाजपा युती असतानाही मुख्यमंत्री ‘मातोश्री’वर चहापानासाठी येतच होते, पण आता राजकारण हे इरेला आणि ईर्षेला पेटले असल्याने कोण कोणाकडे जातात, चहापान करतात यावर मीडियाचे कॅमेरे रोखलेलेच आहेत, असा हल्लाबोल ठाकरे गटाने केला आहे.