25.4 C
Latur
Saturday, February 15, 2025
Homeमहाराष्ट्रमनसेला नाशिकमध्ये धक्का; अनेक पदाधिकारी भाजपात जाणार

मनसेला नाशिकमध्ये धक्का; अनेक पदाधिकारी भाजपात जाणार

नाशिक : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीत सत्तेत येण्याच्या रणनीतीने उतरलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एकही जागा मिळवता आली नाही. एकमेव असलेले आमदार राजू पाटील यांचाही पराभव झाला. त्यामुळे भविष्यात मनसे कधी उभारी घेणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. अशात, पुन्हा एकदा मनसेला मोठा फटका बसला आहे. मनसेचे नाशिकमधील पदाधिकारी राज ठाकरे यांना सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमधील २० ते २५ पदाधिकारी राज ठाकरे यांची साथ सोडून भाजपात प्रवेश करणार आहेत. आज दुपारी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हे पक्षप्रवेश पार पडणार आहेत. परंतु, मनसेतून जे पदाधिकारी भाजपात प्रवेश करत आहेत हे सर्व पदाधिकारी पक्षाच्या स्थापनेपासून मनसेचे कार्यकर्ते राहिले आहेत. त्यामुळे पुन्हा उभारी घेताना राज ठाकरे यांना या पदाधिका-यांची कमी भरून काढावी लागणार आहे.

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. अनेक नेते, पदाधिकारी आणि नगरसेवक आगामी निवडणुकीआधी मोठे निर्णय घेताना दिसत आहेत. अशात विधानसभेवेळी मोठा धक्का बसलेल्या मनसेला आता पालिका निवडणुकीच्या तोंडावर मोठी गळती लागल्याचे चित्र दिसत आहे. मागील महिन्यात राज ठाकरेंनी नाशिकमध्ये येऊन पदाधिका-यांची भेट घेतली होती, मात्र, तरीही पदाधिकारी आज दुपारी भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

२००९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यभरातून मनसेचे १३ आमदार निवडून आले होते. त्यावेळी नाशिक जिल्ह्यातून मनसेचे एकूण तीन आमदार निवडून आले होते. पण २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर मनसेची ताकद कमी होऊ लागली. २०१४ त्यानंतर २०१९ या दोन विधानसभा निवडणुकीत मनसेचा फक्त एक आमदार निवडून आला. आता २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचा एकही आमदार निवडून आलेला नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR