18 C
Latur
Saturday, November 22, 2025
Homeमहाराष्ट्रमनसेसह मविआची मोट बांधण्यासाठी पवार सक्रीय!

मनसेसह मविआची मोट बांधण्यासाठी पवार सक्रीय!

डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न, उद्धव ठाकरे कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींच्या संपर्कात?
मुंबई : प्रतिनिधी
मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसने स्वतंत्र निवडणूक लढण्याची भूमिका घेतली तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकत्र येताना दिसत आहेत. आगामी महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती होऊ शकते. पण राज ठाकरे यांना सोबत घेणे हे काँग्रेसच्या मुंबईतील काही नेत्यांना मान्य नाही. त्यामुळे काँग्रेसने याआधीच स्वतंत्र निवडणुकीची घोषणा केली. पण आगामी काळात महाविकास आघाडीत डॅमेज कंट्रोल होण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे.

काँग्रेसच्या मुंबईतील नेत्यांच्या शिष्टमंडळाने दोन दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी जावून भेट घेतली. यावेळी काँग्रेस नेत्यांनी मुंबई महापालिका निवडणुकांसाठी शरद पवारांना युतीचा प्रस्ताव दिला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि काँग्रेस पक्षाची अनेक वर्षांपासूनची नैसर्गिक युती राहिलेली आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुका एकत्र लढण्यासाठी आघाडीचा आपण प्रस्ताव दिल्याचे काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी सांगितले तर शरद पवारांनी दोन दिवसांत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांशी याबाबत चर्चा करू, असे काँग्रेसच्या शिष्टमंडळाला सांगितले होते.

शरद पवार ठाकरे
बंधूंबाबत सकारात्मक
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही भावांनी राजकीयदृष्ट्या एकत्र येण्यावर शरद पवार यांची सकारात्मक भूमिका असल्याची माहिती आहे. मुंबई महापालिका निवडणूक ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढले पाहिजे, अशी पवारांची भूमिका आहे. मतदार यादीमधील घोळा संदर्भात एकत्रित येत सत्याचा मोर्चा काढता, मग निवडणूक का वेगळी लढता, असा सवाल शरद पवारांनी केल्याची माहिती आहे. महाविकास आघाडीत मनसेला सामील करुन घेण्यासही शरद पवार सकारात्मक असल्याचीही माहिती आहे.

सर्वांच्या एकजुटीसाठी
उद्धव ठाकरे आग्रही
सूत्रांच्या माहितीनुसार सर्वांना सोबत घेऊन लढले तर सर्वांना फायदा होईल. फाटाफूट झाली तर दोघांचे नुकसान होईल. विरोधकांची एकजूट फार महत्त्वाची आहे, अशी उद्धव ठाकरेंची भूमिका आहे. तसचे उद्धव ठाकरे हे सध्या काँग्रेसच्या हायकमांडच्या संपर्कात असल्याचीही माहिती समोर येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR