22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्रमनसे विधानसभा निवडणूक स्वबळावरच लढविणार

मनसे विधानसभा निवडणूक स्वबळावरच लढविणार

मुंबई : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा देणा-या राज ठाकरेंनी विधानसभेसाठी मोठा निर्णय घेतला आहे. आज (गुरुवारी) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्यव्यापी मेळाव्यात राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभेला २२५ जागा लढणार असल्याचे जाहीर केले आहे.

महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत विधानसभेला होणार आहे. लोकसभेतील यशामुळे महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे लोकसभेला महायुतीला साथ देणारी मनसे काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले होते.

राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा देताना महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा देखील घेतल्या होत्या. त्यांनी कोकण, पुणे, कल्याण-डोंबिवलीत सभा घेतल्या. तेथे महायुतीचे उमेदवार विजयी झाले. मात्र, विधानसभेसाठी राज ठाकरे महायुतीसोबत राहणार की नाही याविषयी निश्चितता नव्हती.

मनसेने २२५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची घोषणा केली असली तरी त्यांची ताकद ही महानगरांमध्येच आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये मनसेच्या नेत्यांकडून निवडणूक लढण्याची तयारी देखील केली जात आहे. त्यामुळे मुंबईमध्ये राज ठाकरे यांच्या उमेदवारांमुळे मराठी मतांमध्ये फूट पडून त्याचा फटका उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराला बसण्याचा धोका आहे.

१ ऑगस्टपासून राज ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा
आगामी महाराष्ट्र विधानसभेच्या दृष्टीने मनसेने स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. सगळ्या गोष्टी तपासल्या जाणार, पक्षांतर्गत टीम जिल्ह्यात येतील, तुमच्याशी बोलतील. माझ्याकडे जो काही सर्व्हे येईल त्यानंतर जवळपास १ ऑगस्टपासून मी महाराष्ट्राचा दौरा करतोय. जिल्ह्याजिल्ह्यात भेटीगाठी होतील. पावसामुळे मेळावे घ्यावे की नाही हे ठरवू. पदाधिका-यांशी, महाराष्ट्र सैनिकांशी संवाद होईलच असे त्यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR