21 C
Latur
Tuesday, November 5, 2024
Homeमहाराष्ट्रमनसैनिकांनीच फोडले ‘मनसे’चे ऑफिस

मनसैनिकांनीच फोडले ‘मनसे’चे ऑफिस

अकोला : प्रतिनिधी
अकोला जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनीच मनसेच्या उमेदवाराचे ऑफिस फोडल्याची घटना समोर आली आहे. मनसेच्या अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील उमेदवार प्रशंसा अंबेरे यांनी विरोधकांशी हातमिळवणी करत उमेदवारी अर्जात महत्त्वाची माहिती लपवल्याचा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केला आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली आहे. शिवाय अर्जांची छाननी प्रक्रिया देखील पूर्ण झाली आहे. त्यानुसार ३० ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज छाननी करण्यात आली. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील मनसेच्या उमेदवार प्रशंसा अंबेरे यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला.

प्रशंसा अंबेरे यांचे वय २५ दिवसांनी कमी असल्यामुळे त्यांचा अर्ज फेटाळला. मात्र, अंबेरे यांनी मुद्दाम ही माहिती लपवल्याचा आरोप मनसे कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. त्याच रागातून त्यांनी अंबेरे यांचे कार्यालय फोडले.

अकोल्यातील डाबकी रोड भागातल्या आठवडी बाजार चौकातील अंबेरे यांचे कार्यालय मनसैनिकांनी फोडले आहे. मनसेचे शहर उपाध्यक्ष अविनाश मुरेकर यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी कार्यालयात घुसून ही तोडफोड केल्याची माहिती आहे.

शिवाय उमेदवारी अर्ज फेटाळण्याच्या प्रकारात मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोपही मनसेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिस अधिकचा तपास करत आहेत. तर मनसेचा उमेदवार अपात्र ठरल्याने मनसैनिकांची मोठी निराशा झाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR