मुंबई : प्रतिनिधी
मुंबईतल्या वरळी डोममध्ये एकीकडे मनसे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आज विजयी मेळावा पार पडतो आहे. तर दुसरीकडे मराठी भाषेवरून राज ठाकरे यांना चॅलेंज देणा-या सुशील केडियांचे ऑफिस मनसे कार्यकर्त्यांनी फोडले आहे. सुशील केडिया यांनी राज ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत थेट आव्हान दिले होते. आता मनसैनिकांनी त्यांच्या स्टाईलमध्ये केडिया यांना प्रत्युत्तर दिले आहे.
मीरा-भाईंदर येथे मनसेच्या कार्यकर्त्यांनी मराठी बोलण्यास नकार देणा-या एका दुकानदाराला मारहाण केली होती. त्यावरून परप्रांतीयांनी एकत्र येत मनसेविरोधात मोर्चा काढला. या दरम्यान आणखी एका सुशील केडिया नावाच्या व्यावसायिकाने ‘मी मराठी बोलणार नाही, काय करायचंय ते करून घ्या’ अशा शब्दांत सोशल मीडियावर पोस्ट केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना टॅग करून त्यांनी थेट आव्हानच दिले. यावरून मनसैनिकांचा चांगलाच संताप झाला.
नारळ फेकून सुशील केडिया यांचे ऑफिस फोडण्यात आले आहे. माथाडी कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांनी सुशील केडियाचे ऑफिस फोडल्याची माहिती, मनसे पदाधिकारी सचिन गोळे यांनी दिली. आज ऑफिस फोडलं उद्या घरी जायलाही घाबरणार नाही, असा इशारा गोळे यांनी दिला असून केडियाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असे त्यांनी म्हटले.
गोळे म्हणाले, मला माझ्या माथाडी कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांचा अभिमान आहे, मी त्यांचं अभिनंदन करतो. केडिया नावाचा भेडिया गेली दोन दिवस झाले मराठीविरोधात गरळ ओकत आहे. राज साहेबांना त्याने आव्हान दिलं होतं. मराठी भाषेला आणि मराठी संस्कृतीला त्याने आव्हान दिलं होतं. मागील ३० वर्षे महाराष्ट्रात पैसे कमावतोय, मात्र त्याला मराठी येत नाही, हे आपलं दुर्दैव आहे. राज ठाकरेंचे महाराष्ट्र सैनिक अशांना धडा शिकवण्यासाठी तयार आहेतच, असे सचिन गोळे यांनी म्हटले.
केडिया यांनी काय पोस्ट केली होती?
सुशील केडिया यांनी इंग्रजीत केलेल्या पोस्टमध्ये राज ठाकरेंनी याची नोंद घ्यावी. पुढे ते लिहितात, मी गेल्या ३० वर्षांपासून मुंबईत राहतो तरी देखील मला मराठी व्यवस्थित येत नाही. पण हिंदी भाषिकांना तुम्ही देत असलेल्या वाईट वागणुकीमुळे मी आता असा निश्चय केला आहे की, जोपर्यंत तुमच्यासारख्या लोकांना मराठी माणसांच्या काळजीचं नाटक करण्याची परवानगी मिळत राहील तोपर्यंत मी प्रतिज्ञा करतो की, मी मराठी बोलणार नाही, काय करता बोला?