जालना : गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मोठे आंदोलन उभे केले.
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी ऑगस्टमध्ये मुंबईकडे आगेकूच करण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे रवाना होणार आहेत. यासाठी जरांगे पाटील यांच्या बैठका होत आहेत. अशातच आता बैठकांसाठी दौरा करत असताना मनोज जरांगे यांची तब्येत पुन्हा अचानक बिघडल्याची माहिती समोर आली आहे.
बीड दौ-यावर असताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यानंतर आता त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. जरांगे हे सध्या बीड दौ-यावर आहेत. जालन्यातून बीड दौ-यावर जात असताना भोवळ आल्याने मनोज जरांगे दौरा सोडून माघारी परतले आहेत. जरांगे पाटील यांना उप्षाघात म्हणजे सनस्ट्रोक, अतिसाराचा त्रास होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. तसेच, पुढील काही दिवस विश्रांतीचा सल्ला देखील डॉक्टरांनी दिला आहे.
२९ ऑगस्टला मुंबईत जाणार
मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. आमरण उपोषणाची तारीखही जाहीर केली आहे. २९ ऑगस्टला मुंबईत धडक देऊन आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहेत. यामुळे आता राज्य सरकारच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे. तसेच पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत येणार आहे.