18.6 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रमनोज जरांगेंचे आमरण उपोषण पुन्हा सुरू

मनोज जरांगेंचे आमरण उपोषण पुन्हा सुरू

नाव घेऊन विधानसभेला उमेदवार पाडणार

जालना : प्रतिनिधी
मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून अंतरवाली सराटी येथे उपोषणाला सुरुवात केली आहे. पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली होती, तरी त्यांनी उपोषण करणारच असा ठाम निर्धार केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन त्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. पोलिसांनी नाही तर सरकारने परवानगी नाकारली आहे, असे जरांगे पाटील म्हणाले.

इतके दिवस सरकारचा सन्मान केला. आचारसंहिता असल्यामुळे उपोषण पुढे ढकलले होते. आता आम्हाला सगे-सोय-यांचा कायदा हवा आहे. गरिबांना वेठीस धरले जात आहे. नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीवेळी गर्दी होते, म्हणून शपथविधी सोहळा रद्द करणार का? असे होत नसते. मी उपोषण करणारच आहे. जिल्हाधिका-यांना कोणी निवेदन दिले हे मला माहिती आहे, असे जरांगे पाटील म्हणाले.

इतके दिवस कायद्याचे पालन केले. म्हणूनच उपोषण पुढे ढकलले होते. आता सरकारने कायद्याचे पालन करावे. दोघांंनी कायद्याचे पालन करायला हवे. मला राजकारणात पडायचं नाही. आमच्या मागण्या मान्य करा एवढीच आमची मागणी आहे. शिंदे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे आमचा त्यांच्यावर अजूनही विश्वास आहे, असे जरांगे म्हणाले.

आरक्षण दिले नाही तर विधानसभेला २८८ उमेदवार उभे करेन. विधानसभेला नाव घेऊन उमेदवार पाडणार. मी विधानसभेला उभा राहणार नाही. गोरगरिबांना उभे करणार. सरकारला आंदोलन मोडीत काढायचे आहे. कारण नसताना मला परवानगी नाकारली. पण, आंदोलन मागे घेणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. शेतक-यांनी उपोषण स्थळी येऊ नये. शेतीची कामे सुरू आहेत. आपल्यासाठी शेती महत्त्वाची आहे. मी एकटा याठिकाणी पुरेसा आहे. यावेळी आंदोलनाचा कोणताही कार्यक्रम नाही. आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरू ठेवणार आहे. सरकारला खूप वेळ दिला. आता यापुढे वेळ देणार नाही. आचारसंहिता, कायद्याचा सन्मान केला. आता समाजाचा विषय आहे, असे जरांगे पाटील म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR