जालना : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मागील दोन वर्षांपासून मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात आंदोलन करणारे मनोज जरांगे यांनी नुकतेच मुंबईत आंदोलन करून संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले होते. आता मनोज जरांगे दिल्लीत आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. ऐन गणपती उत्सवाच्या सुरुवातीला मनोज जरांगे मुंबईत येऊन धडकले आणि पाच दिवस त्यांनी राज्याच्या राजधानीत आंदोलन केले. त्यांच्या विविध मागण्यांपैकी हैदराबाद गॅझेटियरची मागणी मान्य झाल्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले आणि हजारो आंदोलक मुंबईतून माघारी गेले होते.
मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्टपासून मुंबईत आंदोलन सुरू केले होते. आझाद मैदान येथे त्यांच्या आंदोलनाला परवानगी देण्यात आली होती. आरक्षणाची मागणी आणि आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हजारोंच्या संख्येने मराठा समाजबांधव मुंबईत दाखल झाले होते. आझाद मैदान, सीएसएमटी स्टेशन, नरिमन पॉईंट या दक्षिण मुंबईत आंदोलकांनी पाच दिवस ठिय्या दिला होता. यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या आंदोलनाकडे लागले होते.
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. २ सप्टेंबर रोजी दुपारी तीनपर्यंत आझाद मैदान रिकामे करण्याचे आदेश कोर्टाने राज्य सरकारला दिले होते. त्याच दिवशी सरकारने मनोज जरांगे यांच्या विविध मागण्यांपैकी हैदराबाद गॅझेटची मागणी मान्य करत त्यासंबंधीचा जीआर काढला. आंदोलन यशस्वी झाल्याचे जाहीर करत मनोज जरांगे आणि आंदोलक पाचव्या दिवशी माघारी फिरले होते. आता हैदराबाद मुक्तिदिनाच्या निमित्ताने हैदराबाद गॅझेटनुसार मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी आज दिल्लीत धडक देण्याची घोषणा केली.