गुवाहाटी : वृत्तसंस्था
हरमनप्रीतने कर्णधारपद सोडल्यानंतर महिला क्रिकेट संघाची नवी कर्णधार कोण याची चर्चा सुरु होती. काही वेळातच मराठमोळ््या स्मृती मानधनाच्या नावाची घोषणा बीसीसीआयने केली. बीसीसीआयने गुवाहाटी येथे झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. मानधना दीर्घकाळापासून संघाची उपकर्णधार म्हणून कार्यरत होती. ती हरमनप्रीतच्या मार्गदर्शनाखाली खूप काही शिकली. तसेच हरमनप्रीतच्या अनुपस्थितीत वेळोवेळी तिने संघाचे नेतृत्वही केले.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला २०२४ आणि २०२६ मध्ये महिला प्रीमियर लीगचे विजेतेपद मिळवून देऊन तिने कर्णधार म्हणून आपली क्षमता यापूर्वीच सिद्ध केली आहे. स्मृती २०१३ पासून भारतीय संघाचा भाग आहे आणि या भूमिकेसाठी तिच्याकडे दांडगा अनुभव आहे. सध्या मानधनाची एकदिवसीय आणि टी-२० फॉरमॅटसाठी कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तिने यापूर्वी १८ टी-२० आंतरराष्ट्रीय आणि ४ एकदिवसीय सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले. बीसीसीआयचे अध्यक्ष मिथुन मिन्हास यांनी मानधनाच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास व्यक्त केला आणि तिने स्वत:ला यापूर्वीच सिद्ध करून दाखवल्याचे सांगितले.
















