उकाड्याने नागरिक त्रस्त, नागपुरात उच्चांकी नोंद
मुंबई : प्रतिनिधी
राज्यात सगळ््याच भागात तापमान वाढले असून, उष्णतेचा पारा टोक गाठत असल्याचे चित्र आहे. आज २० एप्रिल रोजी विदर्भ, मराठवाडा प्रचंड तापला. बहुतांश ठिकाणी ४०-४५ अंश सेल्सिअसच्या तापमान नोंदले गेले. आयएमडीने नोंदवलेल्या कमाल तापमानानुसार आज राज्याच्या उपराजधानी नागपुरात तब्बल ४४.७ अंश सेल्सिअसची नोंद झाली. हे राज्यातील सर्वाधिक तापमान आहे.
अकोल्याचा पारा ४४.३ अंश सेल्सिअसवर आहे तर संपूर्ण विदर्भाचे तापमान ४० अंश सेल्सियसच्या पुढे आहे. मराठवाडाही चांगलाच तापला असून परभणीत ४३.६ अंश तर बीड ४२ अंशांवर स्थिरावले. संपूर्ण कोकणपट्टयात तसेच मुंबई व मुंबई उपनगरात प्रचंड उकाडा जाणवत आहे. उन्हाचा चटका अस झाला आहे. येत्या पाच दिवसांत सिंधूदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर सांगलीत हलक्या पावसाची शक्यता वगळता अन्य कुठेही पावसाची शक्यता नसल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
आजपासून पुढील तीन दिवसांत मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना उष्ण व दमट हवामानाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. बीड, लातूर, धाराशिव जिल्ह्यांत प्रचंड उष्ण हवामान राहणार आहे तर पुणे, सोलापूर जिल्ह्यातही उष्ण व दमट हवामानाचा इशारा देण्यात आला. २१ एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अकोला, नागपूरमध्ये उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला. किमान तापमानाचा पाराही सध्या सामान्यहून अधिक असल्याने मुंबई व उपनगरात आज पारा अधिक नोंदवला गेला.
अनेक राज्यांत पावसाचा इशारा
राज्यासह देशभरात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. दिल्लीत धुळीचे वादळ निर्माण झाले असून, हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. आता बिहारमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, तसेच उत्तर प्रदेशातदेखील हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला. याशिवाय पंजाब, हरियाणा, झारखंड आणि जम्मू-काश्मीरमध्येही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.