देशमुख हत्या प्रकरणातील प्रत्येकावर कारवाई होणार, देवेंद्र फडणवीस यांची भरसभेतून बीडकरांना ग्वाही
बीड : प्रतिनिधी
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणानंतर जिल्ह्यातील राजकारण तापले आहे. यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुरेश धस यांच्या मतदारसंघात विकासकामांच्या भूमीपूजनासाठी पोहोचले. यावेळी त्यांनी आष्टी उपसा सिंचन योजना क्र. ३ चे भूमीपूजन करताना मराठवाड्यातील दुष्काळ भूतकाळ ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील एकाही आरोपीला सोडणार नाही, तर सर्वच गुन्हेगारांवर कठोर कारवाई होईल, अशी ग्वाहीही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.
बीडच्या आष्टी मतदारसंघातील आष्टी उपसा सिंचन योजना क्र.३ अंतर्गत येणा-या शिंपोरा ते खुंटेफळ पाईपलाईन कामाचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. यासोबतच इतर विकासकामांचेही भूमीपूजन केले. याप्रसंगी फडणवीस यांनी जिल्ह्यातील पुढची पिढी दुष्काळमुक्त राहील, असे सांगितले. एका महत्त्वाच्या कामाचे भूमीपूजन करण्यासाठी मी आज येथे आलो. गोपीनाथ मुंडे यांनी विशेष प्रयत्न करुन कृष्णा खो-यातून मराठवाड्याला २३ टीएमसी पाणी मिळवून देण्यासाठी निर्णय घेतला. पण दुर्दैवाने केवळ ७ टीएमसी पाणी आपल्याला सापडले. आमदार सुरेश धस यांच्या मागणीनुसार आष्टीमधील खुंटेफळ प्रकल्पाला मान्यता दिली. धससाहेब, तुम्ही केवळ २ ते ३ टीएमसी पाण्याची मागणी करत आहात, पण आपण ५३ टीएमसी पाणी गोदावरीत आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत, ते झाले तर मराठवाड्याची पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही, दुष्काळ हा भूतकाळ ठरेल, असे फडणवीस म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी धस यांचा उल्लेख आधुनिक भगीरथ असा केला.
स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या खुनाची घटना अतिशय दुर्दैवी आहे. या हत्येसारख्या घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत. या प्रकरणी मग कोणीही असो प्रत्येकावर कारवाई केली जाईल, असा विश्वास मी तुम्हाला देतो, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. सध्या संतोष देशमुख प्रकरणातील ७ आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली असून ते सध्या तुरुंगात आहेत तर आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केले.
बीडचा गौरवशाली
इतिहास पुढे नेणार
बीडचा जो इतिहास सुरेश धस किंवा पंकजा मुंडेंनी सांगितला, इतकी मोठी माणसे आपल्याला बीडने दिली आहेत. तोच इतिहास पुढे न्यायचा आहे आणि एक गौरवशाली बीडचा इतिहास तयार करण्यासाठी आपल्या सर्वांचे जे प्रयत्न आहेत, त्या प्रयत्नांच्या पाठीशी मी ठामपणे उभा राहणार असल्याचेही फडणवीस म्हणाले.
सर्वांना सोबत घेऊन
नवीन बीड निर्माण करू
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपण छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत, शिवरायांनी १८ पगड जातींना एकत्र करून स्वराज्याची निर्मिती केली. त्याप्रमाणेच सर्वांना एकत्रित घेऊन आपल्या इथे नांदायचे आहे आणि एक नवीन बीड आपण तयार करू, असा विश्वासही बीडकरांना दिला आहे.
देवेंद्र फडणवीस बाहुबली
आमदार सुरेश धस यांनी देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख देवेंद्र बाहुबली असा केला. एवढेच नव्हे, तर मला अनेकजण तुझ्याजवळ काय आहे, अशा शब्दांत हिणवले जायचे. परंतु मी त्यांना सांगू इच्छितो, मेरे पास देवेंद्र फडणवीस यांचा आशीर्वाद आहे, असे म्हणत आमदार सुरेश धस यांनी भरसभेत फडणवीसांवर कौतुकाचा वर्षाव केला.
मेरा वचनही हैं मेरा शासन
सुरेशअण्णा धस जसे तुम्ही चित्रपटाचे डायलॉग म्हणालात, तसे आम्हीदेखील म्हणतो. शिवगामीचे वाक्य असते, मेरा वचनही हैं मेरा शासन. जे वचन मी सुरेश धस यांना दिले, तेच माझे शासन आहे. ही गोपीनाथ मुंडेंची लेक आहे. बोलणे एक आणि करणे एक हे माझ्या रक्तात नाही, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.