लातूर : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मराठवाड्यातील जनतेने जो कौल दिला आहे त्याहीपेक्षा अधिक कौल विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळेल, अशा विश्वास काँग्रेसचे स्टार प्रचारक, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी येथे पत्रकार पारिषदेत व्यक्त केला. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर मराठवाड्यातील औद्योगीकरणाला चालना, शाश्वत पिण्याचे पाणी, विकासाचा अनुषेश दळणवळणाचा प्रश्न, रखडलेले रेल्वे प्रकल्प मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न असेल, असेही ते म्हणाले.
महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत माजी मंत्री आमदार अमित देशमुख बोलत होते. आरक्षण, महागाई, बेरोजगारी, अशा सर्वच विषयांत महायुती अपयशी ठरली आहे. महायुती सरकारला राज्यातील जातीय सलोखा राखता आलेला नाही. कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्न आहे. महाविकास आघाडीने मात्र जातीय सलोखा टिकविण्याचे काम सातत्याने केले आहे. या पुढील काळातदेखील असे काम केले जाणार आहे. राज्यात विकास कोण करू शकतो हे जनतेला चांगले माहीत आहे त्यामुळे या निवडणुकीत जनता महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असेही माजी मंत्री आमदार अमित देशमुख म्हणाले.
या वेळी औसा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार दिनकर माने, निलंगा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अभय साळुंके, उदगीर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेवार सुधाकर भालेराव व अहमदपूर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार विनायकराव पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. या वेळी खासदार डॉ. शिवाजी काळगे, माजी खासदार सुधाकर शृंगारे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अॅड. किरण जाधव, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुनील बसपुरे, संतोष सोमवंशी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष राजा मणियार, शेकापचे उदय गवारे, मोईज शेख, लक्ष्मण कांबळे, प्रा. डॉ. स्मिता खानापुरे, अशोक गोविंदपूरकर आदी उपस्थित होते.