मुंबई : प्रतिनिधी
राज्य सरकारने सुरू केलेल्या लाभार्थी महिलांच्या अर्जांची पडताळणीत आता मराठवाड्यातील ५५ हजार ३३४ लाडक्या बहिणींचे अर्ज बाद होणार आहेत.
दरम्यान, राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील निकषांची आता काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे आता निवडणुकीनंतर तब्बल ५ लाख महिला अपात्र ठरल्या आहेत.
या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यात दर महिन्याला १५०० रुपये जमा होत होते. पण आता याच महिलांचे टेन्शन वाढवणारी बातमी आहे. मराठवाड्यातील २१ लाख ९७ हजार २११ पैकी ५५ हजार ३३४ महिलांचे लाडकी बहीण योजनेचे अर्ज रद्द होणार आहेत, तर ५४ हजार ५९८ अर्ज अजून मान्यच झाले नसून, त्यांना अनुदान केव्हा मिळणार हे अद्याप अस्पष्ट आहे.
मराठवाड्यातील ५५ हजार ३३४ महिलांना लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता मिळणार नाही. सध्या या विभागातील सर्व जिल्ह्यांतील संजय गांधी योजनेतील महिला लाभार्थी, शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेणा-या लाभार्थी व इतर योजनांचा लाभ घेणा-या महिला लाभार्थ्यांची माहिती संकलित करणे सुरू आहे.
दरम्यान, राज्याच्या तिजोरीवरचा बोजा कमी करण्यासाठी वित्त विभागाने सरकारी खर्चात ३० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. लाडकी बहीण योजनेत बोगस लाभार्थ्यांची संख्या बरीच आहे. त्यामुळे अपात्र बहिणांना या योजनेतून वगळण्याचे काम सुरूच आहे. आता यासाठी नवीन नियम करण्यात आले आहेत.