छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील ८ हजार ४९६ गावांतील खरीप हंगाम पावसाअभावी शेतक-यांच्या हातून गेला. विभागातील आठही जिल्ह्यांतील अंतिम पैसेवारी ५० टक्क्यांच्या आत आली असून, दुष्काळाच्या दुष्टचक्रात मराठवाडा असल्याचे सध्याचे चित्र आहे.
मागील वर्षी सततच्या पावसाने व अतिवृष्टीने नुकसान केले. त्यापोटी शासनाने २७०० कोटींची घोषणा केली. त्यातील सुमारे १७०० कोटी सततच्या पावसाच्या नुकसानीचे असून, ते पूर्ण क्षमतेने शेतक-यांना मिळालेले नाहीत. त्यातच मार्च-एप्रिल २०२३ मधील अवकाळी पाऊस, सरत्या वर्षातील पावसाळ्यात दोन जिल्ह्यांत अतिवृष्टी व सहा जिल्ह्यांत महिनाभराचा पावसाचा खंड, पुढे रबी हंगामात अवकाळी पिकांनी नुकसान केले असून, त्यासाठी भरपाईचा अद्याप काहीही निर्णय नाही.
निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतक-यांना बसत असून, शासनाकडून मदतीचा ओघ विलंबाने होत असल्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. दरम्यान, विभागातील ७६ तालुक्यांतील सर्व गावांतील अंतिम पैसेवारीनुसार खरीप हंगामाचे उत्पादन घटले आहे. माजलगाव तालुक्यातील ५ गावे पूर्णत: बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत.
साडेनऊ लाख शेतक-यांना फटका
मराठवाड्यात नोव्हेंबर २०२३ महिन्याच्या अखेरीस अवकाळी पावसाचा विभागातील ९ लाख ५० हजार ८३० शेतक-यांना फटका बसला. ४ लाख ८० हजार ३५१ हेक्टरवरील रबी, फळपिके व भाजीपाल्याचे नुकसान झाले. मराठवाड्याला २७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या काळात अवकाळी पावसाने अक्षरश: थैमान घातले. यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २६३९३४ शेतक-यांचे, जालना जिल्ह्यात १९१२१९, परभणी २३१७८७, हिंगोलीत २५७४८७, नांदेड ३७९१, लातूर ६५५, बीड १५ तर धाराशिव जिल्ह्यातील १९१२ शेतक-यांच्या पिकांचे नुकसान झाले.