वीज कोसळून ४ ठार, उन्हाळी पिके, फळझाडांचे मोठे नुकसान
छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
गेल्या पाच दिवसांपासून राज्यात वादळी वा-यासह अवकाळी पावसाचा धडाका सुरू आहे. यामुळे उन्हाळी पिके, फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच वादळी वा-यामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली. झाडे उन्मळून पडली. तसेच विजेच्या पोलचेही नुकसान झाले. त्यामुळे मराठवाड्यासह राज्यात अनेक ठिकाणी मोठी हानी झाली आहे. दरम्यान, रविवारी रात्री उशिरा आणि सोमवारीही जोरदार पाऊस झाला. जालना जिल्ह्यात आज वीज कोसळून २ शेतक-यांचा मृत्यू झाला. जालना जिल्ह्यात रविवारीही दोघे दगावली. दरम्यान, लातूरमध्ये रेणापूर तालुक्यात एकाचा आणि यवतमाळ जिल्ह्यात शेतक-याचा वीज पडून मृत्यू झाला. तसेच नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यात २ तरुण जखमी तर एक म्हैस दगावली.
मराठवाड्यात गेल्या ५ दिवसांपासून वादळी वा-यासह अवकाळी पाऊस कोसळत आहे. त्यातच रविवारी मध्यरात्रीनंतर विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. सोमवारी पहाटे पाचपर्यंत हा पाऊस सुरू होता. त्यानंतर सोमवारी दुपारीही जोरदार पाऊस झाला. त्यामुळे लातूर शहरासह जिल्ह्यात सर्वत्र पाणीच पाणी झाले. रेणापूर तालुक्यात इंदरठाणा येथे वीज कोसळून सालगडी गुणाजी किसन कदम (रा. चिखली, ता. कंधार) यांचा मृत्यू झाला. वादळी वा-यात झाडे, विजेचे पोल जमीनदोस्त झाली. उन्हाळी पिके, भाजीपाला, फळबागांना मोठा तडाखा बसला. जळकोट तालुक्यातही सोमवारी दुपारी वादळी वा-यासह पाऊस झाला. औसा, निलंगा, उदगीर, देवणी, शिरुर अनंतपाळ तालुक्यातही अवकाळीने झोडपले. लातूरसह मराठवाड्यातील धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही अवकाळीने झोडपले.
जालना जिल्ह्यातही जालना, बदनापूर, अंबड, भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यांत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतपिकांची मोठी हानी झाली. जिल्ह्यात फळबागांचे क्षेत्रही मोठे आहे. त्यामुळे फळझाडांची हानी झाली. तसेच वीज कोसळून २ शेतक-यांचा मृत्यू झाला. या अगोदर रविवारीही २ शेतकरी दगावले. हिंगोली जिल्ह्यात ढगफुटीसदृश पाऊस झाला. जोरदार पावसामुळे संत नामदेव हळद मार्केट यार्डमधील शेतक-यांची हळद भिजली. नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यात वीज पडून दोन तरुण जखमी झाले, तर एक म्हैस दगावली.
मराठवाड्यासोबतच राज्यातही विविध ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. दुपारच्या सुमारास अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यात वादळी वा-यासह जोरदार पाऊस झाला. वादळाच्या तडाख्यात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली तर घरावरील पत्रेही उडाले. नाशिक जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम आहे. यवतमाळ जिल्ह्यात अवकाळीने धुमाकूळ घातला. महागाव तालुक्यात टेंभी शिवारातील पिंपळगाव इजारा भागात वीज पडून महिलेचा मृत्यू झाला. पुण्यातही जोरदार पावसामुळे सखल भाग, रस्त्याला तलावाचे स्वरूप आले. सातारा, कोल्हापुरातही अवकाळीचा दणका सुरू आहे.
फळपिकांची हानी
मराठवाड्यात फळझाडे, उन्हाळी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. अवकाळीमुळे या पिकांना फटका बसला. यात केळी, द्राक्ष, भाजीपाला अशा फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक ठिकाणी आंब्याच्या कै-या झाडावरून खाली पडल्या. तसेच मोसंबी आणि डाळिंबाचीही फळगळ झाली.
जालन्यात वीज पडून दोन शेतकरी ठार
अवकाळी पावसादरम्यान भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई शिवारात वीज पडून २ तरुणांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. गणेश जाधव (३२), सचिन बावस्कर (२८) अशी मृतांची नावे आहेत. या अगोदरही रविवारीही भोकरदन तालुक्यातील राहुल विठ्ठल जाधव (१९) आणि भायडी गावच्या शिवारात रामदास कड यांचा मृत्यू झाला होता.
५ दिवस पावसाचा
जोर आणखी वाढणार
वादळी वा-यांसह मराठवाड्यात अनेक ठिकाणी जोरधारा सुरू आहेत. २२ मे रोजी कर्नाटकजवळ अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात १९ मे ते २५ मेदरम्यान पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली.