३ खासदार शिंदे सेनेत, शिंदेंची ताकद वाढली
छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
मराठवाड्यात ठाकरे सेनेला मानणारा शिवसैनिक आणि जनता मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, ठाकरे सेनेच्या शक्तीला सुरूंग लावण्याचे काम शिंदेंच्या शिवसेनेने केले. आधी शिवसेनेचा गड राहिलेल्या छ. संभाजीनगरमधील शिवसेनेच्या नेत्यांना आपल्याकडे वळवून शिंदेंनी ठाकरे सेना खिळखिळी केली. त्यातच खासदाराच्या रूपात ठाकरेंची ताकद पुन्हा अधोरेखीत झाली होती. अर्थात मराठवाड्यात ठाकरेंनी भाजपसह शिंदेसेनेला आपली ताकद दाखवून दिली होती. मात्र, थेट ३ खासदार फोडून मराठवाड्यात शिंदेंनी ठाकरे सेनेच्या शक्तीला सुरुंग लावला. त्यामुळे मराठवाड्यात ठाकरे सेनेला मोठा धक्का दिला आहे. त्यामुळे मराठवाड्यात शिंदे सेनेचे बळ वाढले आहे.
लोकसभा निवडणुकीत ठाकरे सेनेने हिंगोली, परभणी आणि धाराशिव येथील जागा मोठ्या मताधिक्क्याने जिंकत शिंदे सेनेसह भाजपला मोठा झटका दिला होता. एवढेच नव्हे तर शिवसेना फोडूनही ठाकरेंचा प्रभाव मराठवाड्यात चांगलाच असल्याचे दिसून आले होते. परंतु ऐन टप्प्यात येऊन मराठवाड्यातील ठाकरे सेनेचे तीनही खासदार फोडून आपल्या गळाला लावले आणि ठाकरेंची शक्ती क्षीण करण्याचा डाव साधला. त्यामुळे ठाकरे सेनेला मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे मराठवाड्यातील या तिन्ही खासदारांवर शिंदे सेनेचा अगोदरपासूनच डोळा होता. अखेर टप्प्यात आणून शिकार केल्याने ठाकरे सेनेला मोठे भगदाड पडले.
परभणीचे खासदार संजय जाधव, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर हे दोन खासदार तर अगोदरपासूनच शिंदे सेनेच्या संपर्कात होते. हे दोन्ही खासदार योग्य वेळेची वाट पाहात असतानाच निष्ठावान खासदार म्हणून ओळखले जाणारे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी तर ऐनवेळी पलटी मारली आणि शिंदे सेनेत जाण्याचा निर्णय घेतला. राज्यातील ठाकरेंच्या एकूण ९ खासदारांपैकी ६ खासदार शिंदेसेनेत गेले. त्यातील ३ मराठवाड्यातील आहेत. विशेष म्हणजे मराठवाड्यातील हे शिवसेनेचे गड मानले जात होते. परंतु या तिन्ही जिल्ह्यातील खासदारांनी ठाकरेंची साथ सोडून दिल्याने ठाकरे सेनेच्या मराठवाड्यातील गडांना सुरुंग लागला आहे.
















